Post views: counter

पूर्वपरीक्षेचे गणित


                             पूर्वपरीक्षा म्हणजे एक निर्णायक दिवस. दोन तासांचा खेळ. १०० प्रश्न व पूर्ण वर्षभराची मेहनत. त्या दिवशी फासे अनुकूल पडतील की, प्रतिकूल या विचारांनी मनावर दडपण निर्माण होते. या दडपणामागे आपली परीक्षाकेंद्रीत अभ्यासापद्धती आहे. त्या स्थितीतून बाहेर पडायचे सामाजिक दडपण, स्वतःची अस्मिता या सर्वांचे मिश्रण असते. थोडे दडपण चांगले, पण खूप जास्त दडपण उलटा परिणाम घडवून आणू शकते. परीक्षा हा फक्त तुम्ही केलेला अभ्यास तपासायची एक चाचणी आहे. रोज आपण जशा सराव चाचण्या देतो, तशीच एक चाचणी असे समजून चाललात तर बरे.

परतीचे दोर कापले आहेत
                     परीक्षेचा फॉर्म भरणे हा अप्टेंम्ट नसल्याने काही उमेदवार शेवटच्या दिवसांमध्ये माघार घेतात. काही वेळा कारणे खरी असतात. पण, कधीकधी भीती हे त्यामागील कारण असते. अप्टेंम्ट वाया जाऊ नये ही भावना प्रबळ असते. खुल्या वर्गाचे अटेंम्ट लोकसभा निवडणुकीच्या वेळी चारवरून सहावर करण्यात आले. आता परत ते आयोग चारवर आणणार, अशी अफवा उमेदवारांमध्ये आहे.
अशावेळी अटेंम्ट वाचवलेला बरा असे काहींना वाटते. प्रत्यक्षात असे वाढवलेले अटेंम्ट मागे घेणे आयोगाला सोपे जाणार नाही किंवा कमी करायचे म्हटले, तरी दोन वर्षांची तरी नोटीस द्यावी लागेल. ते पाहता या कारणाने तरी माघार घेऊ नका. एक अप्टेंम्ट सोडला की मग अख्खे वर्ष वाया जाते. पुढचा निकाल थेट दोन वर्षांच्या अंतरानेच मिळतो.
व्यूहरचना
                     शेवटच्या दिवसांमध्ये नवीन काही अभ्यास करण्याचा अट्टहास सोडून, आहे तो पक्का करण्याकडे लक्ष पुरवा. फेसबुक, व्हॉट्स अॅप यांना तात्पुरती रजा दया. मोबाइलचा वापर कमीत कमीवर आणा. टीव्ही बघणे बंद करा. फक्त तुमचा माफक व्यायाम मात्र चालू दे.
'सीसॅट पेपर - २'चा दोन तासांचा सराव शेवटपर्यंत चुकवू नका. चालू घडामोडींना जास्त महत्त्व द्या. त्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. मागच्या दोन्ही वर्षी पूर्वपरीक्षेत चालू घडामोडींवर फार कमी म्हणजे सहा व आठ प्रश्न विचारले होते. त्यामुळे काहींना त्या करायचीच गरज नाही असे वाटते, ते बरोबर नाही. अचानक चालू घडामोडींवर प्रश्न वाढू शकतात. शत्रूला कमी लेखू नये, असे म्हणतात. आयोगाच्या सर्व चाली आपल्याला कळल्या आहेत अशा भ्रमात राहू नये. त्यामुळे परीक्षेत प्रश्न येवो न येवो चालू घडामोडींना मोडीत काढू नका.
सराव एके सराव
                     शेवटच्या टप्प्यात आकलनाचा, प्रश्न सोडवण्याचा या सगळ्याचाच वेग वाढलेला असतो. त्याचा फायदा घेऊन पर्यायी उत्तरांचे प्रश्न सोडवायचा सपाटा लावा. या चाचण्यांमध्ये किती गुण मिळत आहेत, हे आता बघू नका किंवा बघितले तरी मनावर घेऊ नका. गट चर्चा आता कमी करत आणा किंवा बंद करून टाका. नकारात्मक विचाराच्या लोकांना भेटणे टाळा. कोणी भेटले तरी उभ्याउभ्याच बोला म्हणजे बोलणे लवकर संपते.
अभ्यासाचा कंटाळा आला, तर अभ्यासाचा विषय बदलून बघा. त्यानेसुद्धा विरंगुळा मिळतो. हॉलतिकीटचे प्रिटंआऊट काढून ठेवा. आपले केंद्र कुठे आहे व तिथे कसे पोहचायचे याची चौकशी करून ठेवा. ते केंद्र इतर कुणा आळखीच्या उमेदवारांना आले आहे का, याची माहिती घ्या.
इस पार या उस पार
                     सर्व विचार अभ्यासावर केंद्रीत करून बाकी सर्व विचारांना दूर पळवून लावा. दिवसाला १४ ते जास्तीत जास्त १६ तासापर्यंत अभ्यास करायला हरकत नाही. पण, त्याहून जास्त शरीराला ताणू नका. आरोग्याची कटाक्षाने काळजी घ्या. कुठल्याही परिस्थितीत शरीराने वा मनाने आजारी पडू नका. मसालेदार जेवण, गोडाचे पदार्थ, आईस्क्रीम अशा गोष्टींपासून दूर रहा. पावसात भिजणे टाळा. पाणी शक्यतो उकळलेले प्या.
विजयी व्हा!
                      फारच टेंशन आले, तर हा विचार करा की अजून तर मुख्य परीक्षा, मुलाखत व अंतिम निकाल बाकी आहे. (पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त) आताच इतके टेन्शन घेतले, तर पुढच्या टप्प्यांसाठी काय राहील. अर्थात इतका पुढचा विचार करायची गरज नाही. एका वेळी एकाच गोष्टीचा विचार केला तर टेन्शन कमी होते. सर्व उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा!

- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)

source: www.mtonline.in