Post views: counter

महाराष्ट्र लोक सेवा आयोगमहाराष्ट्र लोक सेवा आयोग 


MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION
महाराष्ट्र राज्य/ शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार 'महाराष्ट्र लोक सेवा आयोग' निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते.

• महाराष्ट्रामध्ये ' महाराष्ट्र लोक सेवा आयोग' १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला.

महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते.

उदा. १) राज्य सेवा परीक्षा
२)PSI/STI/ASST.
३)महाराष्ट्र वन सेवा परीक्षा
४)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा
५)महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
६)न्यायालयीन सेवा परीक्षा
७)सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
८)लिपिक -टंकलेखक परीक्षा

९)कर सहाय्यक परीक्षा 
परीक्षेसाठी पात्रता:-

शैक्षणिक - 


  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली अर्हता .
  2. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गत- ब पदाकरिता भौतिकशास्त्र व गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी या शाखेतील पदवी
  3. मराठीचे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा -
साधारण प्रवर्गासाठी किमान १९ वर्ष व कमाल ३८ वर्ष आयोगाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या तारखेपर्यंत. कमाल वयोमर्यादेची अट इतर मागास व प्रवर्गासाठी ३ वर्षे अनुसूचित जाती / जमातीसाठी ५ वर्षे शिथिलक्षम खेळाडूंसाठी ५ वर्षे एवढी शिथिलक्षम असेल. अपंग उमेदवारांना वयाच्या ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम असेल.

शारीरिक पात्रता -


१) पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलिस आयुक्त, गट-अ:-


पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक


महिला उमेदवारांकरिता-
उंची- १५७ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)

२) अधीक्षक ,राज्य उत्पादनशुल्क , गट-अ , उप अधीक्षक राज्य उत्पादनशुल्क , गट -ब :-


पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक


महिला उमेदवारांकरिता
उंची- १५५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)

३) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट- ब :-


पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक
चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी.
रंगआंधळेपणा नसावा .


महिला उमेदवारांकरिता
उंची- १६३ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी.
रंगआंधळेपणा नसावा .


राज्यसेवा परीक्षा - 
                      बदलेले स्वरूप पूर्व आणि मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रमात झालेला हा बदल खरे तर अनपेक्षित नव्हताच. आयोगाने परीक्षा पद्धतीत आणि प्रश्नांच्या साचेबद्ध बांधणीत केलेले बदल, STI आणि सहायक पदांसाठी घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षांच्या अभ्यासक्रमात त्या पदाला आवश्यक असलेल्या किमान सामान्य ज्ञानाशी सुसंगत असे बदल आणि त्या नंतर राज्यसेवा मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रम, पद्धतीत केलेले आमूलाग्र बदल ह्या पार्श्वभूमीवर हे सर्व अपेक्षितच होते. शिवाय केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ने सिव्हिल सर्व्हिसेस च्या पूर्व परीक्षेसाठी गेल्या तीन वर्षांपूर्वी केलेले बदल ह्या सगळ्यांचा प्रभाव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या अभ्यासक्रम बदलावर पहावयास मिळतो.

                    ह्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी वेगळ्या स्वरुपाची मानसिकता तयार करणे महत्त्वाचे ठरेल. आता आपण सविस्तरपणे हे सर्व अभ्यासुया.ज्या मित्र-मैत्रिणींनी आताच MPSC परीक्षा द्यायला सुरुवात केली आहे, त्यांना विचारात घेवून अगदी मुलभूत बाबींपासून सर्व समजावून घेवू या. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC दरवर्षी PSI, STI, मंत्रालय सहायक (Asst) आणि राज्यसेवा परीक्षा (State Services)  अशा वेगवेगळ्या परीक्षा घेत असते. शिवाय सरळ सेवा भरती ने काही पदांसाठी परीक्षा घेते.पैकी राज्यसेवा परीक्षेद्वारे विशेष महत्त्वाची अशी पदे भरली जातात.

                   या परीक्षेद्वारे उप-जिल्हाधिकारी(Deputy Collector),पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (Dy.SP/ACP),सहायक विक्रीकर आयुक्त (Asst.Commissioner Sales Tax) ,तहसीलदार,उपनिबंधक सहकारी संस्था (DDR) ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी /गट विकास अधिकारी(Dy CEO/BDO),महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा ह्या गट-अ म्हणजे वर्ग-1 च्या पदांशिवाय वर्ग-2 च्या बऱ्याच महत्त्वपूर्ण पदांसाठी हि सामाईक परीक्षा घेतली जाते.

• MPSC राज्यसेवा परीक्षेचे (State Services) स्वरूप


राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला 3 टप्प्यातून जावे लागते.

1. राज्यसेवा पूर्व परीक्षा -400 गुण
2. राज्यसेवा मुख्य परीक्षा -800 गुण
3. मुलाखत -100 गुण

                      पूर्व परीक्षा ही चाळणी म्हणून वापरली जाते. साधारणपणे एकूण उपलब्ध पद संख्येच्या 13 पट उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी त्यांच्या पूर्व परीक्षेतील 'परफॉर्मन्स' च्या आधारे पात्र म्हणून घोषित केले जाते. बाकीच्या उमेदवारांना पुढील जाहिराती साठी वाट पाहणे भाग पडते. मात्र पात्र उमेदवारांसाठी पूर्व परीक्षेचे गुण हे 'Qualifying' म्हणून धरण्यात येतात. म्हणजेच ह्या गुणांना अंतिम निकालात स्थान नसते.

                    मुख्य परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारे साधारणत: 3 ते 5 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. बाकी उमेदवारांसाठी साप- शिडीच्या खेळातील सापाने गिळल्यानंतर जसे सुरुवातीला जावे लागते तसेच पुन्हा पूर्व परीक्षेपासून सुरुवात करावी लागते. मुलाखत आणि मुख्य परीक्षेतील एकूण गुण संख्येच्या आधारे अंतिम शिफारस पात्र उमेदवारांची यादी जाहीर होते. बाकीच्या दुर्दैवी उमेदवारांना साप- शिडीच्याच खेळाचा नियम लागू होतो, म्हणजे पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात. उमेदवारांनी मुलाखती पूर्वी दिलेले पसंतीक्रम आणि वर्गवारीनिहाय (Categorize-wise)त्यांचे अंतिम गुणवत्ता यादीतील स्थान आणि त्या वर्गवारीसाठी उपलब्ध असलेल्या जागा यांच्यावरून पदनिहाय यादी तयार केल्या जातात.

                    ह्या सुधारित अभ्यासक्रमाने अनुभवी आणि नवीन उमेदवारांना एकाच पातळीत आणून ठेवले.पूर्वीच्या अभ्यासक्रमात पाठांतरावर मोठी भिस्त होती. मात्र आता नवीन पॅटर्न नुसार पूर्व परीक्षेत दोन पेपर असतील. पैकी एक पेपर पारंपारिक घटक म्हणजे भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल, भारतीय राज्यपद्धती, भारतीय अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी यांचा समावेश आहे. अर्थात आयोगाने अलीकडे घेतलेल्या परीक्षांचा विचार केला तर हा पेपर ही त्या त्या विषयातील चालू घडामोडींचा सखोल अभ्यास केल्याशिवाय चांगल्याप्रकारे सोडवता येणे शक्य नाही.पेपर-2 चा विचार करता काही विद्या शाखेच्या (उदा.इंजिनियरिंग) विद्यार्थ्यांना नक्कीच थोडे मार्जिन आहे. अर्थात इतरांनी ना-उमेद होण्याचे काहीही कारण नाही. ह्याचे मुख्य कारण म्हणजे ह्या पूर्व परीक्षेचे गुण अंतिम गुणांत धरले जात नाहीत. आणि व्यवस्थित अभ्यासाने पेपर-2 मध्ये चांगले गुण घेणे कोणालाही शक्य होईल.