Post views: counter

CSAT चे विश्लेषण


                                 सीसॅट भाग - २ची सरंचना कशी आहे ते खालील लेखात स्पष्ट करण्यात आले आहे. 
'संघ लोक सेवा आयोगाने' सन २०११ला नागरी सेवा पूर्वपरीक्षेत 'सामान्य अध्ययन - २' म्हणजेच 'सीसॅट' हा पेपर समाविष्ट केला. त्यानंतर सन २०१३मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्याही 'राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये' सीसॅटचा पॅटर्न अंतर्भूत करण्यात आला. वरील दोनही पूर्वपरीक्षांमध्ये हा पेपर एकूण २०० मार्कांचा असून, यात ८० प्रश्न विचारले जातात. म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला २.५ मार्क असतात. 'सीसॅट' हा पेपर एकूण ७ विभागांमध्ये विभागलेला आहे.  

> आकलन (Comprehension) 
> संभाषण कौशल्यासह आंतरवैयक्तिक कौशल्ये (Interpersonal Skills including communication skills) 
> तर्कशास्त्रीय युक्तिवाद व पृथक्करण क्षमता (Logical Reasoning and analytical Ability) 
> निर्णयक्षमता आणि समस्या निराकरण (Decision making and problem solving) 
> सामान्य मानसिक क्षमता (General mental ability) 
> मुलभूत गणित आणि आलेखाचे पृथक्करण (Basic Numeracy and Data Interpretation) 
> मराठी (केवळ राज्यसेवेसाठी) आणि इंग्रजी भाषेतील आकलन कौशल्ये. (Marathi MPSC only) and English comprehension skills) 

या पेपरमध्ये प्रत्येक चुकीच्या प्रश्नामागे एक तृतियांश म्हणजेच (०.८३) मार्क वगळण्यात येतात. परंतु, निर्णयक्षमता आणि समस्या निराकरणांवरील चुकीच्या उत्तरांसाठी मार्क वजा करण्यात येत नाहीत. 
२०१५च्या नागरी सेवा पूर्वपरीक्षेसाठी सीसॅट हा पेपर पात्रताफेरी गाठण्यासाठी मर्यादीत करण्यात आला आहे. म्हणजेच या पेपरमध्ये आता विद्यार्थ्यांना किमान ३३ टक्के म्हणजेच ६६ मार्क मिळवावे लागणार आहेत. परंतु, मार्कवत्ता यादी ठरविताना 'सीसॅट' पेपरमध्ये मिळालेले मार्क ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. तसेच 'इंग्रजी भाषेतील आकलन कौशल्ये' विभाग क्रमांक - ७वरील प्रश्नसुद्धा वगळण्यात आले आहेत. नागरीसेवा पूर्वपरीक्षेत सीसॅटचा पेपर हा 'मध्यम' काठीण्यपातळीचा असतो. त्यामुळे पात्रता मार्क मिळवण्यासाठी विद्यार्थांनी विशिष्ट मर्यादेपर्यंत सराव करावा. दररोज किमान एक ते दीड तास 'सीसॅट'च्या प्रश्नांचा सराव केल्यास आणि दर आठवड्याला किमान सराव पेपर सोडवल्यास पात्रता गाठणे फारसे कठीण जाणार नाही. 
राज्यसेवा परीक्षेच्या 'सीसॅट' पेपरमध्ये मिळवलेले मार्क हे मार्कवत्ता यादी ठरवण्यासाठी ग्राह्य धरले जातात. त्यामुळे या पेपरला राज्यसेवा पूर्वपरीक्षेची 'सामान्य अध्ययन - १' इतकेच महत्त्व आहे. राज्यसेवा परीक्षेमधील सीसॅटची काठीण्यपातळी ही नागरीसेवा परीक्षेमधीलच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे राज्यसेवा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सीसॅटवर अधिक भर देणे आवश्यक आहे. राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी दररोज दोन तास सीसॅटच्या सराव आणि दर आठवड्याला एक पेपर सोडवल्यास सीसॅटच्या पेपरमध्ये चांगले मार्क मिळू शकतील.
                             सीसॅटची तयारी सुरू करण्याआधी विद्यार्थ्यांनी गतवर्षींच्या प्रश्नपत्रिकांचे विभागनिहाय विश्लेषण करणे आवश्यक आहे. नागरीसेवा पूर्वपरीक्षेच्या 'सीसॅट' पेपरमध्ये 'आकलन' आणि 'इंग्रजी भाषेतील आकलन कौशल्ये' यावर ८० पैकी जवळपास ३० ते ४० (४०% ते ५०%) प्रश्न विचारले जातात. राज्यसेवा पूर्वपरीक्षेत तर ८०पैकी जवळपास ५० (६२.५%) प्रश्न हे आकलन व मराठी आणि इंग्रजी आकलन कौशल्ये या विभागाशी निगडीत असतात. 
सन २०११ ते २०१५मधील नागरी सेवा पूर्वपरीक्षा आणि सन २०१३ ते २०१५मधील राज्यसेवा पूर्वपरीक्षा यांच्यातील सामान्यअध्ययन म्हणजेच सीसॅट या पेपरचे विभागनिहाय विश्लेषण हे खाली दिलेले आहे. कंसातील आकडे हे राज्यसेवेचे आहेत. 
                          शास्त्रीय संगीतामध्ये रियाज केला जातो. तसा सीसॅट हा रियाजचा पेपर आहे. न चुकता न कंटाळता रोज थोडा वेळ अभ्यास केला पाहिजे. अभ्यास म्हणजे केवळ वाचन नाही. हा विषय स्वतः पेन घेऊन सोडवून पाहिल्याशिवाय आत्मसात होत नाही. सुरुवात सोप्या प्रश्नांपासून करून हळूहळू काठीण्यपातळी वाढवत न्यायची. महत्त्वाची सूत्रे, तोडगे, युक्त्या एका वेगळ्या कागदावर काढून ठेवायच्या. सराव करताना हा कागद जवळ बाळगायचा (परीक्षेला बरोबर घेऊन जाऊ नका) .

लेखक- भूषण धूत ( स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक )

source: www.mtonline.in