Post views: counter

गोपाळ हरी देशमुखइंग्रजी शिक्षणातून मिळालेल्या मूल्यांच्या साहाय्याने आधुनिक विचार देण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्रातील अगदी पहिल्या पिढीतील समाजसुधारक!


                      एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे एक नवी पिढी घडत होती. त्या पिढीच्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) होत. गोपाळरावांचे वडील पेशव्यांच्या दरबारात हिशेबनीस म्हणून काम करत होते. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. 


                    १८४८ पासून त्यांनी ‘प्रभाकर’ या साप्ताहिकात ‘लोकहितवादी’ या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. त्या काळी लहान वयातच लग्न करून द्यायची प्रथा होती. लहान वयातील लग्नामुळे काय अडचणी होतात हे त्यांनी प्रभाकरमध्ये पत्र लिहून लोकांच्या नजरेस आणले. पुढील काळात त्यांनी अनेक समस्यांबाबत, विविध विषयांवर पत्रद्वारा लेखन केले. मुंबईचे राज्यपाल हेन्री ब्रौन यांच्या पुढाकाराने गोपाळरावांनी पुण्यात एक लायब्ररी काढली. प्रामुख्याने महाराष्ट्र व गुजरातमध्ये त्यांनी सामाजिक कार्याचा ठसा उमटवला.

                     त्यांची निस्पृह व निःपक्षपाती म्हणून ख्याती होती. याबाबत एक हकीकत प्रसिद्ध आहे. सातार्‍याचे प्रिन्सिपॉल सदर अमीन यांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी गोपाळरावांची नेमणूक करण्यात आली. सदर अमीन यांची चौकशी चालू झाल्यावर चौकशी प्रमुख म्हणून त्यांनी गोपाळरावांचेच नाव सुचविले. त्यांचा गोपाळरावांच्या निःपक्षपातीपणावर विश्र्वास होता. १८५६ साली गोपाळराव असिस्टंट इनाम कमिशनर म्हणून नियुक्त झाले. १८६७ साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉजेस् जज्ज म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गुजरातमधील वास्तव्यात त्यांनी विविध उपक्रम कार्यान्वित केले. येथील ‘प्रेमाभाई इन्स्टिट्यूट’तर्फे ते दरवर्षी व्याख्यानमाला करवीत आणि स्वतःही अनेक विषयांवर भाषणे देत. तेथे त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, तसेच गुजराथी पुनर्विवाह मंडळ स्थापन केले. ‘गुजरात व्हर्नाक्यूलर सोसायटी’ उर्जितावस्थेत आणली. गुजराती व इंग्रजी भाषेत ‘हितेच्छु’ नावाचे साप्ताहिक काढले. त्यांनी गुजरातमध्ये गुजराती वक्तृत्वसभा स्थापन केली.

                    गोपाळरावांना सामाजिक वर्तन व नीती या घटकांना धार्मिक समजुती आणि चालीरीती यांच्या वर्चस्वापासून मुक्त करायचे होते.धर्मसुधारणेची कलमे म्हणून त्यांनी पंधरा तत्त्वांचा उल्लेख या संदर्भात केला होता. धर्माचे काम एका विशिष्ट वर्गाकडे सोपवले गेल्याने हिंदू धर्माला दौर्बल्य आले आहे असा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांचा मूर्तिपूजेला विरोध होता. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व यांसारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी हल्ला चढविला.

                   १८४८ ते १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध ‘शतपत्रे’ नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे ‘प्रभाकर’ या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी सुमारे ३५ ग्रंथ लिहिले. अनेक उत्कृष्ट ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, लोकहितवादी इत्यादी नियतकालिके काढण्याच्या कामी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. ‘मातृभाषेतून शिक्षण’ या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला. १८७७ मध्ये दिल्ली दरबारप्रसंगी ब्रिटिश शासनाने ‘रावबहादूर’ ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते.
भारतातील प्रबोधन-चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी केलेल्या विविध क्षेत्रांतील अध्ययन-लेखन व कार्यामुळे त्यांना `प्रबोधनाचे आद्य प्रवर्तक म्हटले जाते. गं. बा. सरदार त्यांचा उल्लेख यथार्थतेने `महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे प्रवर्तक' असा करतात.

source : www.manase.org