Post views: counter

Current Affairs Sept 2015 Part - 5
 • सौरव गांगुली बनला कॅबचा अध्यक्ष

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला गुरुवारी बंगाल क्रिकेट संघटनेचा (कॅब) अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गांगुलीला अध्यक्ष नियुक्त केल्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सचिवालयात कॅबच्या सिनियर पदाधिकारी आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत केली.एक अन्य महत्त्वपूर्ण घटनाक्रमात दालमिया यांचे चिरंजीव अभिषेक यांना दोन संयुक्त सचिवांपैकी एका पदावर नियुक्त करण्यात आले. अभिषेक दालमिया गांगुलीची जागा घेतील. सुबीर गांगुली दुसरे संयुक्त सचिव म्हणून पूर्वीप्रमाणेच जबाबदारी पार पाडतील. विश्वरूप डेदेखील कोषाध्यक्ष म्हणून कायम असतील.हा निर्णय कॅब पदाधिकाऱ्यांनी घेतला असे मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरीत्या स्पष्ट केले. आपण फक्त राज्यांत क्रिकेटला पुढे आणण्यास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी उपस्थित होतो, असे त्यांनी म्हटले; परंतु दिवंगत दालमिया यांच्या स्थानी गांगुलीला नियुक्त करण्यात सरकारने हस्तक्षेप केला. मी हस्तक्षेप करणे योग्य नव्हते. त्यांनी चांगले काम करावे हीच माझी इच्छा होती. मी फक्त एक सहकारी म्हणून उपस्थित होते. सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला. मी घोषणा करू इच्छित नव्हते; परंतु सर्वांनी मला आग्रह केला. अनेक वर्षे देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सौरव गांगुलीसारख्या खेळाडूने ही भूमिका बजवायला हवी असे मला वाटले आणि त्याने अभिषेक, सुबीर, विश्वरूप आणि अन्य सर्वच सिनियर सदस्यांच्या रूपाने एक टीम बनवायला हवी, असे बॅनर्जी म्हणाले .

 • वाळू उत्खननाचे नवे धोरण:

•देशभर फोफावलेल्या वाळू माफियांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने वाळू उत्खनन धोरणाचा नवा मसूदा तयार केला
•यापुढे सरसकट वाळू उत्खनन
करता येणार नाही. रिमोट सेन्सिंगच्या साह्य़ाने नदीकिनारी असलेला वाळूचा साठा सर्वप्रथम निश्चित करण्यात येईल. केवळ त्याच भागात वाळू उत्खनन करण्यास परवानगी असेल.
•जिल्हास्तरावर पर्यावरण प्रभाव पाहणी प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल. वाळू उत्खनन करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्यासाह्य़ाने त्याची नोंद करण्यात येईल. यासाठी बार कोड असलेली एमआयसीआर पावती व्यावसायिकांना देण्यात येईल
•यासंबंधीचा मसूदा संकेतस्थळावर उपलब्ध असून येत्या १ जानेवारीपासून नव्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
•जिल्हास्तरीय प्रभाव पाहणी प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हाधिकारी असतील. त्यांना सहकार्य करण्यासाठी जलसंपदाविभागातील कार्यकारी अभियंता प्रमुख असलेली जिल्हास्तरीय तज्ज्ञ मूल्यमापन समिती नेमण्यात येईल. हीच समिती पाच हेक्टपर्यंत वाळू उपशास परवानगी देईल.

नव्या वाळू धोरणाची वैशिष्ट्ये :-
वाळू उपसा करतेवेळीच ठेकेदारांना दिल्या जाणाऱ्या पावत्यांना विशिष्ट "बारकोड‘- उपग्रहाच्या साहाय्याने नद्यांची "क्षेत्रे‘ ठरविणे- वाळू उपशाबाबत संबंधित राज्यांनाच अधिकार देणे- वाळूचोरांवर कारवाईचे अधिकार मुख्यत्वे राज्यांना देण .


 • सूर्यापेक्षा पाच हजार पट अधिक वस्तुमानाचे कृष्णविवर

भारतीय वैज्ञानिकाचे संशोधनसूर्यापेक्षा पाच हजार पटींनी अधिक वस्तुमान असलेल्या कृष्णविवराचा शोध मध्यम आकाराच्या कृष्णविवराच्या अस्तित्वाचा पुरावा भारतीय वंशाच्या एका वैज्ञानिकाच्या नेतृत्वाखालील पथकाने शोधला आहे. कृष्णविवराचा असा मध्यम आकाराचा वर्ग असतो यावर या संशोधनाने शिक्कामोर्तब झाले आहे.जवळपास सर्व कृष्णविवरे शून्य ते दोन या आकारात येतात. आंतरतारकीय वस्तुमान सूर्यापेक्षा अब्जावधी पट अधिक असलेल्या कृष्णविवरांचाही त्यात समावेश होतो. खगोल वैज्ञानिकांच्या मते मध्यम आकाराच्या कृष्णविवरात दोन टोकाचे आकार असू शकतात, पण त्याचे पुरावे मिळत नव्हते, पण ते आता मिळत आहेत. किमान सहा कृष्णविवरे या गटात सापडली आहेत. मेरीलँड विद्यापीठ व नासाच्या गोडार्ड स्पेस सेंटरच्या खगोलशास्त्रज्ञांनी नवीन मध्यम आकाराच्या व सूर्यापेक्षा पाच हजार पट जास्त वस्तुमानाच्या कृष्णविवराचे पुरावे दिले आहेत. मध्यम आकाराच्या कृष्णविवरांमध्ये त्यामुळे एकाची भर पडली आहे. याच वैज्ञानिकांनी अशाच वर्गातील कृष्णविवर ऑगस्ट २०१४ मध्ये शोधून काढले होते. पूर्वीच्या अभ्यासानुसार सूर्याच्या वस्तुमानापेक्षा ४०० पट अधिक वस्तुमान असलेले कृष्णविवर आहे व नासाच्या रोसी एक्स रे टायमिंग एक्स्प्लोरर उपग्रहाने व युरोपीय अवकाश संस्थेच्या एक्सएमएम न्यूटन उपग्रहाने त्याचे पुरावे दिले आहेत.आता ज्या कृष्णविवराचे पुरावे मिळाले आहेत, त्याचे नाव एनजीसी १२१३ एक्स १ असेआहे. ते कृष्णविवर म्हणजे क्ष किरणांचा स्रोत आहे. विश्वातील प्रखर क्ष किरणांचे ते स्रोत आहेत. काही खगोल वैज्ञानिकांच्या मते ही मध्यम आकाराची कृष्णविवरे मोठय़ा प्रमाणात वस्तुमान ओढत असून, त्यात घर्षण होऊन क्ष किरणांची निर्मिती होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर एनजीसी १२१३ एक्स १ कृष्णविवरातून क्ष किरणांची आतषबाजी होत आहे. एक कृष्णविवर मिनिटाला २७.६ वेळा प्रखर क्ष किरण बाहेर टाकते, तर दुसरे १७.४ वेळा क्ष किरण बाहेर टाकते. या संशोधनात भारतीय वंशाचे विद्यार्थी धीरज पाशम यांनी नेतृत्व केले असून ते स्पेस सायन्स इन्स्टिटय़ूटचे विद्यर्थी आहेत. नासाच्या गोडार्ड केंद्रातील संशोधकांनाही एमबी८२ एक्स १ या कृष्णविवराची क्ष किरण प्रखरता व एनजीसी १२१३ एक्स १ या कृष्णविवराची क्ष किरण प्रखरता यांचे गुणोत्तर ३-२ असे दिसून आले आहे. त्यामुळे आताचे कृष्णविवर हे जास्त वेळा क्ष किरण बाहेर टाकते. आंतरतारकीय वस्तुमान असलेल्या कृष्णविवरांसाठी हे गुणोत्तरम्हणजे एक स्थायी गुणधर्म आहे की नाही हे अजून निश्चित नाही.पाशम यांच्या मते कृष्णविवराजवळ जेव्हा जास्त वस्तुमान गुरुत्वाने दाबले जाते,त्यामुळे क्ष किरण निर्मिती होऊन ते चमकत असावेत. अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्सया नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

 • रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या एटीममध्ये 50 रुपयांच्या नोटा उपलब्ध :

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने देशभरातील सर्व बॅंकांना एटीममध्ये 50 रुपयांच्या नोटा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बॅंकांची कारवाई सुरु असल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तपत्राने दिले आहे. सध्या एटीएममधून केवळ 100, 500 आणि 1000 च्या नोटा काढता येतात. मात्र ग्राहकांच्या सोयीसाठी 50 रुपयांच्या नोटाही एटीएममध्ये उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश रिझर्व्ह बॅंकेने देशातील सर्व बॅंकांना दिले आहेत. भारतीय स्टेट बॅंकेने तर रायपूर येथील एटीएममध्ये तर 50 रुपयांच्या नोटा उपलब्ध करून दिल्या आहेत. येत्या काही दिवसात सर्वच बॅंका आपल्या ग्राहकांना 50 च्या नोटा उपलब्ध करून देणार आहेत. यापूर्वी 2013 मध्ये रिझर्व्ह बॅंकेने देशातील सर्व बॅंकांना 10, 20 आणि 50 च्या नोटा उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती.

 • गोंधळाच्या वातावरणात गुगलला व्हाइस सर्चसाठी कमांड देता येणार :

माहिती शोध घेण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी, गोंधळाच्या वातावरणात, ऍड्रॉईड स्मार्टफोनवरून गुगलला व्हाइस सर्चसाठी कमांड देता येणार असून पूर्वीपेक्षा अधिक अचूक निर्णय मिळणार असल्याची माहिती गुगलने दिली आहे. त्यासाठी गुगलने "व्हाइस सर्च टूल"वर विशेष काम केले आहे. गुगलवर शोध घेण्यासाठी अपेक्षित माहितीबाबत "टेक्‍स्ट सर्च", "इमेज सर्च" तसेच "व्हाइस सर्च" यापैकी कोणतेही एक इनपुट द्यावे लागते. त्यानंतर गुगल सर्च रिझल्टद्वारे माहिती किंवा माहितीचे स्रोत पुरवितो. मात्र यापूर्वी "व्हाइस सर्च" ही सुविधा फारशी प्रभावी नव्हती. त्यामुळे गुगलने सविस्तर अभ्यास करून आपल्या प्रणालीमध्ये सुधारणा केल्या आहेत. नव्या प्रणालीनुसार गुगल अतिशय जलद गतीने शब्दांना ओळखणार असून संबंधित शब्दांना तत्काळ वेगळे करून अपेक्षित रिझल्ट देणार आहे. विशेष म्हणजे गोंधळाच्या वातावरणातही ही प्रणाली प्रभावीरीत्या काम करणार असल्याचा दावा गुगलने केला आहे.

 • बराक ओबामा यांनी भारतीय वंशाच्या व्यक्तींची सल्लागार परिषदेवर केली नियुक्ती :

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी भारतीय वंशाच्या तीन अमेरिकन व्यक्तींची सल्लागार परिषदेवर नियुक्ती केली. यात प्रीता बंसल, निपुण मेहता आणि जसजित सिंह यांचा समावेश आहे. आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आणि धर्मनिरपेक्ष व्यक्तींची या परिषदेवर निवड केली जाते. प्रीता बंसल एमआईटीत व्याख्याता आहेत. तसेच निपुण मेहता सर्व्हिस स्पेस या संघटनेचे संस्थापक, तर जसजित सिंह शीख अमेरिकन लीगल डिफेंस अ‍ॅण्ड एज्युकेशन फंडचे कार्यकारी संचालक आहेत.

 • राष्ट्रीय सुरक्षा मंडळाने मंजूर केलेल्या प्रकल्पांची विशेष तपासणी करण्याचा निर्णय :

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सुरक्षा मंडळाने मंजूर केलेल्या प्रकल्पांची विशेष तपासणी करण्याचा निर्णय महालेखापरीक्षकांनी (कॅग) घेतला आहे. संवेदनाक्षम संस्थांना अधिकाधिक जबाबदार करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून 'कॅग'ने हे प्रथमच पाऊल उचलण्याचे ठरविले आहे. राष्ट्रीय सुरक्षा मंडळाने मंजूर केलेल्या प्रकल्पाची विशेष तपासणी करण्याचा प्रस्ताव 'यूपीए-2' सरकारच्या राजवटीच्या अखेरच्या कारकीर्दीत मंजूर झाला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या नव्या राजवटीत त्यास अंतिम मंजुरी मिळाली. अशा प्रकारच्या प्रकल्पांची विशेष तपासणी करण्याचे काम सुरू झाले असून पहिला गोपनीय अहवाल लवकरच अंतिम टप्प्यात येईल, असे 'कॅग'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 'नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन'ची विशेष तपासणी 2010 मध्ये हाती घेण्यात आली.

 • भारत-अमेरिका वाघांच्या संबंधी करार :

भारतातील विशिष्ट प्रजातीच्या बंगाली वाघांची संख्या घटत चालली असून त्यांचे संरक्षण व शोध यासाठी भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे. वन्यजीव संवर्धनासाठी वन्यजीव तस्करी टाळणे आवश्यक आहे, त्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. याबाबतच्या समझोता करार मसुद्याला अंतिम रूप देण्यात आले आहे. भारत व अमेरिका यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात या समझोता कराराचा उल्लेख करण्यात आला होता. भारत-अमेरिका यांच्यातील धोरणात्मक व व्यापारी भागीदारी संवाद कार्यक्रमात हे निवेदन जारी करण्यात आले आहे. भारताच्या व्याघ्र प्रकल्पात वाघांचे व त्यांच्या अधिवासाचे संरक्षण केले जाणार आहे. वाघांची शिकार व तस्करी रोखण्यासाठी दोन्ही देशात करार झाला. परराष्ट्र खात्याच्या निवेदनानुसार वाघांचा अधिवास, वैज्ञानिक माहितीचे नियोजन, वन्यजीव संवर्धन व धोक्यात असलेल्या प्रजातीतील वाघांची संख्या वाढवणे यावर भर दिला जाणार आहे. यात कायदा अंमलबजावणीतही अधिक मदत होणार असून वन्यजीवांची बेकायदा तस्करी रोखली जाणार आहे. वन्यजीव संवर्धन व तस्करी रोखण्यासाठीच्या या समझोता कराराचे दोन्ही देशांनी स्वागत केले असून यात पर्यावरण व परिसंस्थेतील विविधता राखण्यास मदत होणार आहे.

 •  एपीजे अब्दुल कलाम यांच्या मल्याळी पुस्तकाचे प्रकाशन रद्द

 दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या ‘ट्रान्सेंडन्स: माय स्पिरिच्युअल एक्स्पिरियन्सेस विथ प्रमुख स्वामीजी’ या अखेरच्या पुस्तकाच्या मल्याळी अनुवादाचा शनिवारी येथे आयोजित केलेला औपचारिक प्रकाशन समारंभ महिलांच्या संतप्त प्रतिक्रियांनंतर रद्द करण्यात आला. बोचासणवासी अक्षरपुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या प्रमुख स्वामींच्या सहवासातून व चर्चेतून अनुभवलेल्या आध्यात्मिक अनुभूती डॉ. कलाम यांनी या पुस्तकात कथन केल्या आहेत.डॉ. कमाल यांच्या या मूळ इंग्रजी पुस्तकाचे श्रीमती श्रीदेवी एस.कार्था यांनी मल्याळीत भाषांतर केले असून त्रिचूर येथील ‘करन्ट बूक्स’ या प्रकाशन संस्थेने त्याचे प्रकाशन केले आहे. त्रिचूर येथील साहित्य अकादमी इमारतीमधील सभागृहात प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. स्वामीनारायण पंथाचे प्रतिनिधी म्हणून स्वामी ब्रह्मविहारी दास यांना निमंत्रित करण्यात आले होते.स्वामीनारायण पंथाचे स्वामी महिलांचा सहवास पूर्णपणे निषिद्ध मानतात व असा सहवास टाळण्यासाठी ते प्रसंगी अतिरेकी वाटावी एवढी काळजी घेत असतात. पुस्तकाच्या भाषांतरकर्त्या या नात्याने श्रीमती कार्था प्रकाशन समारंभास उपस्थित राहणे स्वाभाविकहोते.

 • दारिद्र्य निर्मूलनासाठी महत्त्वाकांक्षी योजना मंजुर

 येत्या १५ वर्षांत जगातून गरिबी उच्चाटन करून विषमता दूर करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेस संयुक्त राष्ट्रांच्या सर्व १९३ सदस्य देशांनी मान्यता दिली आहे. त्याचबरोबर ‘टिकाऊ विकासा’संबंधी (सस्टेनेबल डेव्हलपमेंट) संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेची सांगता झाली.‘टिकाऊ विकास’ योजनेतहत आगामी १५ वर्षांत भूक आणि दारिद्र्य समाप्त करावयाचे आहे. त्याचबरोबर स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता सर्वांना सन्मानित जीवन जगण्याची संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या ऐतिहासिक वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील सर्व नेते उपस्थित होते.१९३ सदस्यीय महासभेने ‘आपल्या जगात बदल : टिकाऊ विकासासाठी २०३० ची कार्यक्रमपत्रिका’ हा प्रस्ताव मंजूर केला. या प्रस्तावातच पुढील १५ वर्षांत ‘दारिद्र्याचे पूर्णपणे उच्चाटन, विषमता आणि हवामानातील बदल’ या मुद्यावर ‘१७ उद्दिष्टे’ आणि ‘१६९ लक्ष्य’ निश्चित केले आहेत.अनेक वर्षे आणि महिने सखोल चर्चा करून ही नवीन कार्यक्रमपत्रिका मंजूर करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या ७० व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित महासभेसाठी जागतिक वित्तीय संस्थांचे प्रमुख आणि अन्य ज्येष्ठ नेते संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आले असताना या महत्त्वाकांक्षी योजनेला मान्यता देण्यात आली.संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी या कार्यक्रमपत्रिकेला ‘बिगुल’ या शब्दात संबोधले. ते म्हणाले की, हीच कार्यक्रमपत्रिका सर्वांना समान जीवन जगण्याची, समृद्धीची, शांतीची, सशक्त करणाची संधी देणार आहे. सध्याची पिढी आणि भावी पिढी यांना ही कार्यक्रमपत्रिका फायद्याची ठरेल.

 1. आगामी १५ वर्षांत संयुक्त राष्ट्रांनी जी १७ उद्दिष्टे निश्चित केली आहेत, त्यात दारिद्र्याचे संपूर्णपणे निर्मूलन, भूक पूर्णपणे दूर करणे, उच्च शिक्षण, समानता, स्थिरशहर आणि समाज, तसेच स्वच्छ पाणी आणि साफसफाई यांचा समावेश आहे.
 2. २०१५ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांसाठी ऐतिहासिक ठरेल, असा अधिकाऱ्यांचा कयास आहे. यातून कोणताही देश विकासापासून दूर राहणार नाही आणि विकासाची व्याख्याच बदलेल, असे या अधिकाऱ्यांना वाटते.
 3. त्यातून याच वर्षी जागतिक हवामान बदलविषयक कराराला प्रोत्साहन मिळेल. अमेरिकेत प्रथमच आलेले पोप फ्रान्सिस यांनी महासभेत ऐतिहासिक भाषण केले.आणखी संबंधित बातम्या


 • चटई उद्योगाला उतरती कळा;३० टक्के उत्पादन घटले

गेल्या दोन वर्षांपासून शेती हंगामाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन घटले आहे़ जळगावातील चटई उद्योगाच्या उत्पादनाचा ‘फेरीवाला’ म्हणजेच विक्रेतावर्ग हा बहुतेकग्रामीण भागातील व शेती क्षेत्राशी निगडित असल्याने, त्याचा थेट परिणाम या उद्योगावर होत आहे़गेल्या दोन वर्षांत या क्षेत्रातील ३० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन घटले आहे़ यावर्षी जवळपास ७५ टक्क्यांपेक्षा जास्त फेरीवाले येथे खरेदीसाठी फिरकलेच नाहीत़ त्यामुळे गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून वसाहतीमध्ये अनेक चटई निर्मात्यांकडे बराचतयार मालाचा साठा पडून आहे़आशियातील सगळ्यात मोठा चटई व्यवसाय जळगावात आहे़ या उद्योगातील उत्पादनाचा विक्रेता (फेरीवाला) दारोदारी जाऊन चटईची विक्री करतो़ यातील बहुतेक जण चार महिने खरिपाच्या हंगामातून मिळालेला पैसा चटई खरेदी करण्यासाठी गुंतवतात व गल्लोगल्ली विकतात़मात्र, गेल्यावर्षी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ त्यानंतर सततच्या होणाऱ्या शेतीच्या नुकसानीमुळे या शेतकरी वर्गातील फेरीवाल्यांकडून खरेदीचे प्रमाण घटले़ गेल्यावर्षीपासून ही परिस्थिती कायम असल्याने सततच्या आर्थिक अडचणींमुळेगुंतवणूक करण्यासाठी फेरीवाल्यांकडे सध्या पैसा उपलब्ध नाही़ तसेच त्यांनी असलेला थोडाफार पैसा पुन्हा शेतीतच गुंतवला आहे़ त्यामुळे निर्मित चटईला उठाव मिळत नसल्याने चटई उत्पादन व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे़ तसेच परराज्यात जाणारा माल होलसेल विक्रेत्यांकडूनही घेणाऱ्या फेरीवाल्यांच्या संख्येत घट झाल्याने त्या विके्रत्यांनीही मालाची खरेदी कमी केली आहे़ पडून असलेल्या मालाला दिवाळीपर्यंत चालनामिळण्याची अपेक्षा मॅट असोसिएशनचे माजी अध्यक्ष नंदकुमार जैस्वाल यांनी व्यक्त केली आहे़विविध कारणांमुळे विदेशातील मागणी घटली आहे़ दुबई व सौदी राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय विक्री मार्केट आहे़ तेथे जाणारा माल जगभरात विविध देशांमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो़ मात्र, सध्या जागतिक मंदीचे सावट व नायजेरिया, सुदान आणि इथिओपिया आदी देशांत असलेले अस्थिरतेचे वातावरण अशा कारणांमुळे चटई मालाची विदेशातील मागणी घटली आहे़ १०० टक्के निरुपयोगी व फेकलेल्या प्लास्टिकपासून ही चटई तयार केली जाते़ इतर राज्यांमध्ये वीजदर ५ ते ६ रुपये युनिट आहे, तर तुलनेत महाराष्ट्रातील वीजदर८ ते ९ रुपये युनिट असल्याने तो महाग आहे़ त्यातच पर्यावरणपूरक व्यवसाय असूनही या उद्योगावर विविध करांची आकारणी करून सरकारकडून व्यावसायिकांची पिळवणूक होतआहे़

 • चर्चित पुस्तके:-

कुशावर्ताचा कोतवाल:- डॉ. रवींद्र सिंगल

स्ट्रेट टू द हार्ट :- फ्लॅव्हिआ पेनेट्टा

इंडिया द क्रूशल इयर्स :- टी. व्ही. राजेश्वर

पाकिस्तान्स सिक्रेट वॉर ऑन अल कायदा‘:-एजाझ सय्यद(मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याविषयी ‘अल कायदा‘चा म्होरक्याा ओसामा बिन लादेन याला पूर्वकल्पना होती, असा दावा त्याने या पुस्तकामध्ये केला)

 • सानिया आणि मार्टिना यांनी ग्वांग्झू ओपन टेनिस स्पर्धेतील विजेतेपद :

विम्बल्डन आणि यूएस चॅम्पियन जोडी भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करताना शनिवारी येथे ग्वांग्झू ओपन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अव्वल मानांकित सानिया-हिंगीस जोडीने यजमान चीनच्या शिलिन शू आणि शियोदी यू या बिगरमानांकित जोडीचा 6-3, 6-1 अशा सलग सेट्समध्ये पराभव करताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
 ग्वांग्झू इंटरनॅशनल सेंटरमध्ये झालेल्या एकतर्फी लढतीत भारतीय-स्वीस जोडीने अवघ्या 58 मिनिटांत अंतिम सामना जिंकला. या वर्षी सलग दोन ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावणाऱ्या जागतिक क्रमवारीतील महिला दुहेरीतील अव्वल खेळाडू सानिया आणि हिंगीस यांनी सर्व्हिसवर 70 टक्के आणि दुसऱ्या सर्व्हिसवर 64 टक्के गुण घेतले.

 • नायजेरियाचे नाव पोलिओग्रस्त देशांच्या जागतिक यादीतून वगळले :

जागतिक आरोग्य संघटनेने (हू) नायजेरियाचे नाव पोलिओग्रस्त देशांच्या जागतिक यादीतून वगळले आहे. आफ्रिकेतील सर्वात दाट लोकसंख्येच्या या देशात एक वर्षापेक्षा जास्त काळापासून पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही. नायजेरियन प्रशासनाने नियोजनपूर्वक राबविलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेमुळे त्याला हे यश मिळाले.
 पोलिओग्रस्त देशांच्या यादीत आता केवळ पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोनच देशांची नावे उरली आहेत. नायजेरियाला पोलिओग्रस्त देश नसल्याचे घोषित करताना 'हू'ने म्हटले की नायजेरियात पोलिओ विषाणूंच्या संसर्गाला प्रथमच अटकाव करण्यात आला आहे. त्यामुळे हा देश पोलिओमुक्त देश बनण्याच्या निकट पोहोचला आहे. नायजेरियात पोलिओचा अखेरचा रुग्ण 24 जुलै 2014 रोजी आढळून आला होता. एखाद्या देशात 12 महिन्यांपर्यंत पोलिओचा रुग्ण आढळून न आल्यास त्या देशाचे नाव पोलिओग्रस्त देशांच्या यादीतून वगळण्यात येते.


 • विविध अहवाल :

* मुंबई, दिल्ली जगातील स्वस्त शहरं, न्यूयॉर्क महागडं -

* स्विस बँक यूबीएसने जगभरातील 71 शहरांचा तुलनात्मक अभ्यास करून प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार न्यूयॉर्क हेजगातील सर्वात महागडं शहर असल्याचं नमूद केले

* महागड्या शहरांच्या यादीत न्यूयॉर्कपाठोपाठ स्वित्झर्लंडमधील झुरीक आणि जिनेव्हा, नॉर्वेचं ओस्लो, लंडन आणि हाँगकाँग या शहरांचा नंबर लागतो.

* लंडन पाचवं महागडं शहर असल्याने अन्य शहरांच्या तुलनेत येथील राहणीमान परवडणारं नाही. लंडनच्या तुलनेत सिडनी, कोपनहेगन आणि शिकागोमध्ये राहणं स्वस्त आहे.

* स्वस्त शहरांच्या यादीत बल्गेरियातील सोफिया, चेक प्रजासत्तकची राजधानी प्राग, रुमानियातील बुकारेस्ट आणि युक्रेनचं कीव या शहरांचा समावेश आहे. • राज्यातील ७० टक्केग्रामीण कुटुंबात टीव्ही प्रसारण केबल सेवेद्वारे:-


* ग्रामीण महाराष्ट्रात ७० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचेकेबल हेच टीव्हीच्या उपभोगाचे माध्यम बनले आहे, असे क्रोम रूरल ट्रॅक या अखिल भारतीय स्वरूपाच्या पाहणीतून पुढे आले

* पंजाब, हरयाणा आणि केरळ या राज्यांतील गावांमध्ये अनुक्रमे ९९.६ टक्के आणि ९९.१ टक्केटीव्ही प्रसारण हे केबलद्वारे आढळून आले* त्याच वेळी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या गावांमध्ये टीव्हीचे प्रसारण हे ६२.४ टक्के डीटीएच माध्यमातून झाले असल्याचे दिसते.

 • * संयुक्त राष्ट्र संघाचा ब्रॉडबॅंड आयोग:-

* जगातील इंटरनेट वापरणाऱ्यांच्यासंख्येत वाढ होण्याचा वेग मंदावत असून जगाची अर्धी लोकसंख्या अद्यापही इंटरनेटपासून दूर आहे, असा अहवाल या आयोगाने दिला

* जगातील 48 गरीब देशांमधील 90 टक्के जनता इंटरनेटच्या वापरापासून दूर आहे. मागील वर्षी इंटरनेट वापराच्या वाढीचा वेग 8.6 टक्के होता. तो यंदा 8.1 वर येण्याची शक्यता अहवालात व्यक्त केली आहे.

* 2012पर्यंत हा वेग दहा टक्क्यांच्या वर होता. सध्याचा वेग पाहता जगातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या चार अब्जांवर नेण्याचे उद्दिष्ट 2020 पर्यंत पूर्ण होण्याचीशक्यता कमी असल्याचे अहवाल सांगतो. तसेच, इंटरनेटचा वापर करणाऱ्यांपैकी नियमित वापर असणाऱ्यांची संख्याही बरीच कमी आहे.

* सध्या जगातील 43.4 टक्के नागरिकांना इंटरनेटचा वापर करण्याची सोय आहे. संयुक्त राष्ट्र संघाला ही संख्या 60 टक्क्यांपर्यंत न्यायची आहे. गरीब देशांमध्ये पुरुषांपेक्षा 25 टक्के कमी महिलांना इंटरनेटचा वापर करण्याची सोय उपलब्ध आहे.

*जगातील ज्ञात 7,100 भाषांपैकी फक्त पाच टक्के भाषांचेच प्रतिनिधित्व इंटरनेटवर होते.

* सशक्त अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण कमाल पातळीवर पोचले असून, त्यात आताफारशी वाढ होत नसल्याचे ही या अहवालात म्हटले3.2 अब्ज : इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या2.9 अब्ज : 2014 मधील वापरकर्त्यांची संख्या4 अब्ज : अपेक्षित संख्या

 • चर्चेतील व्यक्ती 

हिडेकिची मियाझाकी:-

वयाचे शतक गाठल्यानंतरही आपण अजूनही शंभर टक्के तंदुरुस्त असल्याची खात्री देत जपानच्या १०५ वर्षांच्या हिडेकिची मियाझाकी यांनी शंभर वर्षांपुढील वयोगटाच्या धावण्याच्या शर्यतीत ४२.२२ सेकंद अशी विश्व विक्रमी वेळ दिली. त्यांच्या या कामगिरीची दखल थेट गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली

शिविंदर सिंग :-

औषध निर्माण तसेच आरोग्यनिगा क्षेत्रात कोटय़वधींची ताबा आणि विलिनीकरण घडवून आणणारे शिविंदर सिंग यांनी आध्यात्माचा मार्ग पत्करला
फोर्टिस हेल्थकेअरचे कार्यकारी उपाध्यक्ष असलेले शिविंदर सिंग लवकरच अमृतसरमधील आध्यात्मिक संस्था असलेल्या राधा स्वामी सत्संगमध्ये रुजू होत आहेत.
सिंग बंधूंपैकी (मलविंदर सिंग) एक शिविंदर सिंग हे अवघे ४० वर्षांचे आहेत. मात्र ते फोर्टिसचे सह संस्थापक व कार्यकारी उपाध्यक्ष राहिले आहेत. १ जानेवारी २०१६ पासून ते कंपनीचे बिगर कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून राहतील
आरोग्य विषयातीलच व्यवस्थापन पदवीप्राप्त शिविंदर सिंगहे तब्बल दोन दशके फोर्टिसबरोबर राहिले.
९० च्या दशकात मलविंद सिंगबरोबर त्यानी फोर्टिसची स्थापना केली.
त्यांच्या रॅनबॅक्सीमधील काही हिस्साही त्यांनी २००८ मध्ये जपानच्या दाय-इची सॅन्कोला विकला. रेलिगेअर एन्टरप्राईजेस, सुपर रेलिगेअर लेबॉरटरिज तसेच रेलिगेअर टेक्नॉलॉजिजचीहीत्यांनी धुरा सांभाळली.

मार्टिन विंटरकॉर्न:-

* प्रदुषणाची मात्रा कमी दाखविणारी सॉफ्टवेअर रचना डिझेल वाहनांमध्ये बसविले प्रकरणात फोक्सव्ॉगने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्टिन विंटरकॉर्न यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला
* जर्मन कंपनीच्या डिझेलवरील तब्बल १.१० कोटी वाहनांमध्येसदोष सॉफ्टवेअर बसविल्याची कबुली देण्याची नामुष्की कंपनीवर गेल्या आठ दशकात प्रथमच आली.

 •  सुरक्षा परिषद; कालबद्ध सुधारणा हवी

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची मानसिकता आजची नाही, तर गेल्या शतकातील आहे. दहशतवाद आणि हवामान बदल या नव्या आव्हानांशी ती सुसंगत नाही, असा घणाघात करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सुरक्षा परिषदेत कालबद्ध सुधारणेची गरज असल्याचे जोर देऊन सांगितले.जी-४च्या (सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वाचे प्रमुख दावेदार भारत, जर्मनी, जपान व ब्राझील यांचा गट) शिखर परिषदेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही, जागतिक अर्थव्यवस्थेचे मोठे घटक व सर्व प्रमुख खंडांचे प्रतिबिंब उमटेल अशा रीतीने तिच्यात सुधारणा व्हायला हवी. तसे झाल्यास सुरक्षा परिषद २१ व्या शतकातील आव्हानांच्या निपटाऱ्यासाठी अधिक प्रातिनिधिक आणि अधिक परिणामकारक बनेल. या परिषदेला जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल, जपानी पंतप्रधान शिन्झो अॅबे, ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष दिल्मा रौसेफ यांची उपस्थिती होते

 • भारताचे पहिले अॅस्ट्रोसॅट सॅटेलाईटअवकाशात झेपावले.

मंगळ अभियान यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आता भारताने अंतराळ क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारताचे आज पहिले पीएसएलव्ही सी-30 अॅस्ट्रोसॅट सॅटेलाईट अवकाशात झेपावलं आहे. अशा प्रकारचे उपग्रह अवकाशात सोडणारा भारत जगातील चौथ्या नंबरचा देश बनला आहे.हे उपकरण श्रीहरिकोटा येथून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सतीश धवन स्पेश सेंटर इथून हे अवकाशात सोडण्यात आलं. या आधी अशा प्रकरचं उपग्रह अमेरिका, रशिया आणि जपान या देशांनी सोडलं आहे. पीएसएलव्ही सी-30 मधून इंडोनेशिया, लापान ए-2 हा मायक्रो सॅटेलाईट, कॅनडाचा एनएलएस 14 नॅनो सॅटेलाईट आणि अमेरिकेचे लेमुर हे चार सॅटेलाईटही प्रेक्षेपित करण्यात आले. पीएसएलव्ही सी-30 चे वजन 302.20 टन एवढं आहे.

काय आहे अॅस्ट्रोसॅट:-

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) माहितीनूसार, उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीवर होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करुन त्याचे विश्लेषण करण्याच्या उद्देशाने या अॅस्ट्रोसॅटचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.अॅस्ट्रोसॅटच्या माध्यमातून अल्ट्राव्हायलेट रे, एक्स-रे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम यासारख्यांचे विश्लेषण केले जाईल. त्यासोबतच मल्टी-व्हेवलेंथ ऑब्जर्व्हेटरीच्या माध्यमातून ताऱ्यांच्या मधील अंतरही मोजता येईल.
या उपग्रहाच्या माध्यमातून अवकाशातील हालचालींचा वेध घेणे आपल्याला शक्य होणार आहे. इतकेच नव्हे तर अवकाशातील अतिनील, कमी आणि उच्च क्षमतेच्या लहरी, कृष्णविवरसारख्या विविध हालचालींवर एकाच वेळी लक्ष ठेवता येणार आहे.अशा प्रकारे बहुद्देशीय अभ्यास करणारा हा पहिलाच उपग्रह असल्यामुळे या अभ्यासात इस्रो नासापेक्षा एक पाऊल पुढे राहणार आहे. या उपग्रहातील ‘सॉफ्ट एक्स रे टेलिस्कोप’, ‘लार्ज एरिया एक्स रे प्रोपरशनल काऊंटर’ आणि ‘कॅडमियम झेनिक टेल्युराइड इमेजर’ उपकरणे मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) वैज्ञानिकांनी विकसित केलेले आहेत.

अॅस्ट्रोसॅट'ची वैशिष्ट्ये:-

1) ‘अॅटस्ट्रोसॅट' ही भारताची अंतराळातील पहिली वेधशाळा

 2) ‘अॅटस्ट्रोसॅट' वेधशाळेच्या दृष्टीक्षेपात देशातील सर्व खगोल संस्था आणि काही महाविद्यालयं असतील.

 3)  ‘अॅोस्ट्रोसॅट'चं वजन 1513 किलोग्रॅम आहे. ‘अॅास्ट्रोसॅट' पृथ्वीच्या खालील कक्षेत 650 किमी उंचावर स्थिरावण्यात येईल.

 4)  भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचं मिशन ऑपरेशस कॉम्प्लेक्स (मॉक्स)  या मोहिमेची देखरेख करेल.

 5)  अद्ययावत उपकरणाद्वारे मिळालेली माहिती, आकडे मॉक्स जमिनीवरील इस्रोकडे पाठवेल.

 6)  ‘अॅवस्ट्रोसॅट'सह विविध देशांचे सहा उपग्रहांचंही उड्डाण होत आहे. यामध्ये अमेरिकेचे चार नॅनो उपग्रह आहेत. तर कॅनडा आणि इंडोनेशियाचा एक-एक उपग्रह आहे.

 7) भारत पहिल्यांदाच अमेरिकेच्या व्यावसायिक उपग्रहांचं प्रक्षेपण करत आहे.

 • देशातील २४ वे व राज्यातील दुसरे ‘सीपेट’ लवकरच चंद्रपूरलाऔरंगाबादनंतर चंद्रपुरातील हे केंद्र राज्यातील दुसरे आणि विदर्भातील पहिलेच केंद्र राहणार आहे. 


केंद्र सरकारने चंद्रपूर जिल्ह्य़ात ‘सेंट्रल इंस्टिटय़ूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी (सीपेट) ला मंजुरी दिली आहे. केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून ही मंजुरी मिळाली असून सध्या या केंद्रासाठी जागेचा शोध युध्दपातळीवर घेतला जात आहे.
औरंगाबादनंतर चंद्रपुरातील हे केंद्र राज्यातील दुसरे आणि विदर्भातील पहिलेच केंद्र राहणार आहे, हे विशेष. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या केंद्रासाठी लवकरच एक जागा निश्चित करण्यात येणार असून साधारणत: दोन ते तीन महिन्यात हे केंद्र सुरू होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
‘सीपेट’चे मुख्यालय चेन्नईत असून केंद्र सरकारने १९६८ मध्ये ही संस्था तेथे सुरू केली तेव्हापासून या संस्थेची प्रगती सुरू आहे. ‘सीपेट’चे सध्या देशभरात २३ केंद्रे आहेत. यात अहमदाबाद, अमृतसर, भोपाल, भुवनेश्वर, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, हाजीपूर, हलदीया, इंफाल, जयपूर, कोची, लखनऊ, म्हैसूर, पानीपत व औरंगाबादचा समावेश आहे. चंद्रपुरातील हे २४ वे केद्र असेल. विशेष म्हणजे, या केंद्राला केंद्रीय मंत्र्यांनी तात्काळ मंजुरी देखील प्रदान केली.
आता यासाठी चंद्रपुरात प्रशस्त जागेचा शोध घेतला जात आहे. ही जागा सर्व दृष्टीने अनुकूल असायला हवी, याची विशेष काळजी घेतली जात आहे. वेकोलिच्या वर्कशॉपमध्ये हे केंद्र सुरू करावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वेकोलिची पद्मापूर, दुर्गापूर व ताडाळी येथील जागेची पाहणी करण्यात आली आहे. मात्र, अजून तरी कुठलीही जागा निश्चित झालेली नाही. चंद्रपूर शहरालगत आणखी काही सरकारी जमिनींचीही पाहणी करण्यात येत आहे.
‘सीपेट’ सुरू होतच चंद्रपूर व त्यातल्या त्यात विदर्भातील विद्यार्थी व तरुणांना त्याचा लाभ मिळणार आहे. या केंद्रात चार स्तरीय प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येते. डिप्लोमा, पोस्ट डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट व डॉक्टरेटचा यात समावेश आहे. या अभ्यासक्रमांचा कालावधी दीड वष्रे, दोन वष्रे, तीन वष्रे आणि पाच वष्रे आहे.
यासाठी प्रत्येक वर्षी प्रवेश परीक्षा जुलैच्या दुसऱ्या रविवारी देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाते. तसेच १३ हजार ७५० ते २२ हजार रुपये फी स्वरूपात घेतले जातात. या केंद्रामुळे विदर्भातील मुलांना प्लास्टिक प्रोसेसिंग, टेस्टिंग, क्वालिटी कंट्रोल, मॅन्युफॅक्चरिंग, आर्ट आदि सर्व बाबींचा तांत्रिक अभ्यास शिकविला जाणार आहे. स्कील डेव्हलपमेंट आणि इतर सर्व प्रकारच्या शाखा यात असतील.


 • पंकज अडवाणी विश्वविजेता १४ व्या जेतेपदाला गवसणी

जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले. पंकजचे कारकीर्दीतील हे १४ वे विश्वविजेतेपद आहे.

स्नूकर आणि बिलियर्ड्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने नवनवी शिखरे पादाक्रांत करणाऱ्या भारताच्या अडवाणीने अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले. पंकजचे कारकीर्दीतील हे १४ वे विश्वविजेतेपद आहे. ३० वर्षीय पंकजने अफलातून खेळासह सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टवर ११६८ गुणांनी विजय मिळवला.
‘गुण स्वरूपातील अंतिम लढतीत पीटरविरुद्ध मला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे हे जेतेपद पटकावण्याचा मी निश्चय केला होता. अंतिम लढतीपूर्वी क्रीडा मानसशास्त्रज्ञ असलेल्या भावाशी डावपेचांविषयी सविस्तर बोलणे झाले आणि त्यानुसार खेळ होऊ शकल्यानेच जेतेपद प्रत्यक्षात साकारले. पुरेशी झोप झालेली असल्याने ताजातवाना होतो’, असे पंकजने सांगितले.
सातत्याने विश्वविजेतेपदे नावावर केल्यामुळे गोल्डन बॉय, अशी बिरुदावली पटकावलेल्या पंकजने वेळ प्रकारातले विश्वविजेतेपद कायम राखले आणि गुण प्रकारात आठवडाभरापूर्वी झालेल्या पराभवाची परतफेडही केली.पंकजने १२७ गुणांची झटपट आघाडी घेतली. यंदाच्या वर्षी ६ रेड स्नूकर जागतिक विजेता असलेल्या पंकजने ३६० आणि ३०१ गुणांची कमाई केली.
भारतीय स्नूकर आणि बिलियर्ड्स विश्वाचा चेहरा असलेल्या या गुणी खेळाडूने ७०० गुणांच्या आघाडीसह विजयाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. २८४, ११९, १०१ आणि १०६ च्या ब्रेकसह पंकजने आपली आघाडी हजारापुढे नेली. दुसऱ्या सत्रात दोन शतकी ब्रेकसह पंकजने आगेकूच केली. मात्र, पीटरने २८४ आणि दोन शतकी ब्रेकसह पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, झंझावाची फॉर्ममध्ये असलेल्या पंकजने ४३० च्या ब्रेकसह जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. जेतेपदासह पंकजने बिलियर्ड्स विश्वात जेतेपदांवरची मक्तेदारी सिद्ध केली.
‘गेले काही वर्ष स्नूकर आणि बिलियर्ड्स, अशा दोन्ही प्रकारांमध्ये सातत्याने सहभागी होत आहे. ६ रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदाने सुरुवात झाली आणि बिलियर्ड्समधील जेतेपदाने हंगामाचा शेवट होत आहे’, याचे समाधान आहे, असे पंकजने सांगितले.

 • आरसीईपी देशांसोबतच्या व्यापारासाठी

भारत, चीन व जपानसह जगातील १६ देशांचे प्रमुख उद्योगपती भविष्यात परस्परांच्या व्हिसामुक्त व्यापार दौऱ्यावर येऊ शकतील. यामुळे विविध देशांतील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळेल. गृहमंत्रालयाने या महत्त्वाकांक्षी योजनेस सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) या प्रस्तावित व्यापार कराराचे सदस्य देश येत्या १२ ते १६ आॅक्टोबरदरम्यान दक्षिण कोरियाच्या बुसान येथे होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा करणार आहेत. १६ सदस्यीय आरसीईपीमध्ये १० आसियान देश आणि त्यांचे व्यापारी भागीदार भारत, दक्षिण कोरिया, जपान, चीन, आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा समावेश आहे.प्रस्तावांतर्गत आशिया-पॅसिपिक आर्थिक सहकार्य परिषदेच्या (अपेक) धर्तीवर आरसीईपीच्यासदस्य देशांच्या उद्योगपतींना एक विशेष व्यापार यात्रा कार्ड जारी केले जाईल. याद्वारे उद्योगपती परस्परांच्या देशात व्हिसामुक्त अल्पकालीन दौरे करू शकतील. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, आम्हाला वाणिज्य मंत्रालयाकडून एक प्रस्ताव मिळाला आहे. सैद्धांतिकदृष्ट्या हा व्यवहार्य असल्याचे आम्ही कळविले आह

 • आशियाई नेमबाजीत अभिनव बिंद्राला सुवर्ण

 आॅलिम्पिक सुवर्ण विजेता‘ गोल्डन बॉय’ अभिनव बिंद्रा याने आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत रविवारी दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.डॉ. कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये बिंद्राने २०८.८ गुणांसह सुवर्णांवर नेम साधला. लंडन आॅलिम्पिकचा कांस्य विजेता गगन नारंग हा चौथ्या आणि चैनसिंग सहाव्या स्थानावर राहिले.बिंद्रा, नारंग आणि चैनसिंग हे २०१६ च्या रियो आॅलिम्पिकसाठी आधीच पात्र ठरले आहेत.३२ वर्षांच्या बिंद्रापाठोपाठ कझाखस्तानचा विश्व क्रमवारीत आठव्या स्थानावरील युरकोव्ह युकिरी याने २०६.६ गुणांसह दुसरे आणि कोरियाचा यू जीचूल १८५.३ याने तिसरे स्थान मिळविले. लंडन आॅलिम्पिकमध्ये याच प्रकारात कांस्य जिंकणाऱ्या नारंगला १६४.५ गुण मिळाल्याने तो चौथ्या स्थानावर घसरला. चैनसिंग हा १२२.७ गुणांसह सहाव्या स्थानावरआला. नारंगने १०.६ गुणांचे दोन शॉट मारून चांगली सुरुवात केली खरी पण पुढच्या प्रयत्नांत तो माघारला. चैनसिंग याला शूट आॅफमध्ये कोरियाच्या खेळाडूने मागे टाकले. बिंद्रा याने चांगली कामगिरी कायम ठेवून सर्वच प्रतिस्पर्धी खेळाडूंना मागे टाकले.गगनसोबत कुठल्याही प्रकारची स्पर्धा नसल्याचे स्पष्ट करीत अभिनव म्हणाला,‘असे केवळ मीडियात वाचायला मिळते.’ भारताचे रायफल कोच स्टेनिसलाव लेपिड्स यांना बिंद्राच्या कर्तृत्वावर शंका नव्हतीच. ते म्हणाले,‘या निकालाबद्दल मला शंका नव्हतीच. या प्रकारात गगनला देखील यश मिळावे, अशी मला अपेक्षा होती. गगन भविष्याची तयारी करीत आहे.’भारताने १० मीटर एअर रायफलचे सांघिक सुवर्णदेखील जिंकले. बिंद्रा, नारंग आणि चैनसिंग यांच्या जोडीने १८६८.६ गुणांसह अव्वल स्थान घेतले. कोरिया संघ दुसऱ्या आणि सौदी अरब संघ तिसऱ्या स्थानावर आला. भारताने युवा गटात एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली.ज्युनियर गटातही दोन रौप्य पदके मिळाली. सत्यजित कंडोल याने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण जिंकले. त्याने २०४.८ गुण, चायनीज तायपेईचा शाओ चुआन लू याने २०३.७ आणि इराणचा दवोद अबाली अब्बासाली याने १८३.८ गुण मिळविले. कंडोल, मिथिलेश आणि गजेंद्र राज यांनी याच प्रकारात १८२७.७ गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली. कोरियाने सुवर्ण जिंकले. ज्युनियर गटात प्रणतिक बोस याने २०३.९ गुणांसह रौप्य जिंकले. इराण आणि कोरियाच्या खेळाडूंनी क्रमश: सुवर्ण आणि कांस्य पटकाविले.

 • मंगळ ग्रहावर गोठलेल्या अवस्थेत पाणी :


मंगळ ग्रहावर गोठलेल्या अवस्थेत पाणी आहे. एवढेच नव्हे तर उन्हाळ्यात मंगळावर खाऱ्या पाण्याचे प्रवाह वाहतात, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. जीवसृष्टीसाठी पाणी हा अत्यावश्‍यक घटक आहे, त्यामुळे सोमवारी शास्त्रज्ञांनी जाहीर केलेला शोध महत्त्वाचा ठरणार आहे. मंगळ ग्रहावर पाणी असल्याचा दावा अनेक वर्षांपासून केला जातो. मात्र, ताजा निरीक्षणांमधून हे स्पष्ट झाले आहे की, उन्हाळ्यात मंगळावरील उतारांवरून खाऱ्या पाण्याचे प्रवाह वाहताना दिसतात. मंगळावरील उन्हाळ्याच्या काळात जेव्हा सर्वाधिक तापमान असते, त्या वेळी गोठलेले पाणी वितळण्यास सुरवात होते.त्यामुळे उतारांवरून खाऱ्या पाण्याचे झरे वाहत असल्याचे आढळून आल्याचे मत शास्त्रज्ञांनी मांडले आहे. मिठामुळे पाण्याचा गोठण बिंदू कमी होतो, त्यामुळे पाण्याचे प्रवाह तयार होतात, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. मंगळ ग्रहावर अतिसूक्ष्म जिवांच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत असून, त्यादृष्टीने आजचा शोध महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात येते. 2006 पासून मंगळाच्या भोवती फिरत असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेच्या (नासा) "मार्स ऑर्बिटर"ने पाठविलेल्या माहितीच्या आधारे शास्त्रज्ञांनी मंगळावरील पाण्याच्या अस्तित्वाबद्दल नवा शोध लावला आहे.

 • रेल्वे मंत्रालयाच्या साहाय्याने देशातील 500 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवा उपलब्ध :

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकप्रिय सर्च इंजिन असलेली गुगल कंपनी पुढील वर्षात भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या साहाय्याने देशातील 500 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवा उपलब्ध करून देणार आहे. गुगल कंपनीच्या मुख्यालयाच्या भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. गुगल कंपनी सुरवातीला भारताच्या 100 रेल्वे स्थानकांवर ब्रॉडबॅंड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देईल. त्यानंतर पुढच्या वर्षाअखेरीस आणखी 400 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवा उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली. तसेच अँड्रॉइड युजर्ससाठी लवकरच 11 भाषेत टायपिंग करता येणारी नवी प्रणाली उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा गुगलने केली. देशातील 125 कोटी जनतेचा विचार करून गुगलने सामान्यांसाठी फायदेशीर ठरेल असे ऍप तयार करावे, असे मोदी म्हणाले.

 1. क्वॉलकॉम : 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार; हा पैसा स्टार्टअप कंपन्यांना देणार. भारतात चीप डिझाइन करणार
 2.  मायक्रोसॉफ्ट : भारतात लवकरच क्‍लाऊड डाटा सेंटरची घोषणा करणार. 5 लाख खेड्यांना "आयटी‘शी जोडणार
 3.  गुगल : भारतातील 500 रेल्वे स्टेशनवर वाय-फाय सुविधा देणार, 11 भारतीय भाषांमध्ये इंटरनेट अँड्रॉइड फोन लॉंच करणार
 4.  ऍपल : भारतात मॅन्युफॅक्‍चरिंग प्रकल्प सुरू करण्यास आणि "ऍपल पे" जनधन योजनेसोबत जोडण्यास संमती दिली


 • राज्यातील बचत गटांसाठी अम्मा मोबाईल योजना सुरू :

राज्यातील बचत गटांसाठी अम्मा मोबाईल योजना सुरू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री जयललिता यांनी विधानसभेत केली. बचत गटातील प्रशिक्षणार्थींना मोबाईल आवश्‍यक असल्याने त्यांना अशा प्रकारची सुविधा मिळणे आवश्‍यक आहे, असे जयललिता म्हणाल्या. अम्मा मोबाईलमध्ये एक विशेष ऍप्लिकेशन असणार आहे. या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून बचत गटांची माहिती उपलब्ध होणार आहे. शिवाय, प्रत्येक सभासदाला आपल्या खात्यामधील रक्कम, कर्जाबाबतची माहिती व बैठकीची तारीख कळू शकणार आहे. प्रत्येक बचत गटाच्या प्रमुखामार्फत हे मोबाईल दिले जाणार आहेत. राज्यात 6 लाख 8 हजार बच गट आहेत. या बचत गटामधील महिला सभासदांची संख्या 92 लाख एवढी आहे. पहिल्या टप्प्यात 20 हजार प्रशिक्षणार्थींना मोबाईल देण्यात येणार असून त्याची किंमत 15 कोटी इतकी असेल. "अम्मा मोबाईल"मध्ये बचत गटासंदर्भातील सॉफ्टवेअर असून त्याची माहिती महिलांना दिली जाणार आहे. तमिळनाडूत अम्मा नावाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी अम्मा सिमेंट, अम्मा मिनरल वॉटर आणि अम्मा कॅंटीन. आता अम्मा मोबाईल नावाने नवीन योजना कार्यान्वित होत आहे.

 • गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार संगीतकार प्रभाकर जोग यांना जाहीर :

राज्य शासनातर्फे प्रदान करण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2015 या वर्षासाठी ज्येष्ठ व्हायोलिनवादक व संगीतकार प्रभाकर जोग यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीतील संगीतकार अजय व अतुल यांनी प्रभाकर जोग यांच्या नावाची शिफारस केली. या समितीत सांस्कृतिक कार्य सचिव वल्सा नायर सिंह, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, स्वानंद किरकिरे, श्रेया घोषाल यांचा समावेश आहे.

 • महिला बॉक्सर मेरी कोम ऑलिम्पिक स्पर्धेनंतर बॉक्सिंगमधून निवृत्ती घेणार :


भारताची दिग्गज महिला बॉक्सर मेरी कोम हिने आपल्या निवृत्तीचे संकेत देताना आगामी रिओ ऑलिम्पिक माझ्यासाठी शेवटची असून, या स्पर्धेनंतर बॉक्सिंगमधून निवृत्ती घेणार, असे सांगितले. त्याच वेळी यानंतर खेळाडू या नात्याने नाही मात्र प्रशिक्षक म्हणून बॉक्सिंगशी कायम जोडली जाणार, असेही मेरीने सांगितले.

 • नासाची नवीन रोव्हर गाडी 2020 मध्ये मंगळावर सोडली जाणार :

नासाची नवीन रोव्हर गाडी 2020 मध्ये मंगळावर सोडली जाणार असून ती अणुइंधनावर चालेल. आताच्या क्युरिऑसिटी व अ‍ॅपॉरच्युनिटी रोव्हरगाडय़ांपेक्षा ती जास्त प्रगत असणार आहे. ही गाडी आता तयार करण्यात येत आहे. अनेक बाबतीत ही गाडी आधीच्या रोव्हर गाडय़ांपेक्षा वेगळी आहे. स्पेस डॉट कॉमच्या वृत्तानुसार नवीन रोव्हर गाडी वजनदार असेल व तिची चाके लांब व जास्त जड असतील त्यामुळे ही गाडी मंगळावर वेगळ्या पद्धतीने मार्गक्रमण करणार आहे. क्युरिऑसिटी गाडीपेक्षा ही गाडी जास्त वेगाने चालू शकेल. अलगॉरिथमच्या मदतीने तिची दिशा हवी तशी बदलता येईल. थोडक्यात ती स्मार्ट म्हणजे चतूर असेल. गाडी चालवण्यात अडचणी असणार नाहीत किंबहुना त्यावर फार वेळ खर्च होणारच नाही. मंगळावरील महत्त्वाच्या भागांवर ही गाडी जाईल तसेच तेथील वैज्ञानिक माहिती पाठवेल. जेनिफर यांच्या मते क्युरिऑसिटीपासून विचार केला, तर त्या गाडीची कार्यक्षमता 55 टक्क्य़ांवरून 80टक्के केली होती. आता 2020 मध्ये मंगळावर जाणाऱ्या रोबोट रूपातील या रोव्हर गाडीची कार्यक्षमता 95 टक्के इतकी असेल.

 • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित मंत्रिमंडळ बैठकींची कागदपत्रे सार्वजनिक केली :

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाइल्स अवर्गीकृत केल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने सोमवारी नेताजी व त्यांच्याशी संबंधित विषयांवरील 1938 ते 1947 या काळातील मंत्रिमंडळ बैठकींची कागदपत्रे (कॅबिनेट पेपर्स) सार्वजनिक केली. ही कागदपत्रे स्वातंत्र्यपूर्व काळात कदाचित गोपनीय असतीलही, परंतु आज ती सर्वासमोर आणण्याची आवश्यकता आहे. ही कागदपत्रे राज्याचे पुराभिलेख संग्रहालय, राज्य माहिती केंद्र आणि मध्यवर्ती ग्रंथालय येथे नागरिक, संशोधक, इतिहासतज्ज्ञ आणि विद्यार्थी यांना पाहण्यासाठी उपलब्ध राहतील, असेही त्या म्हणाल्या. वरील कालावधीतील मंत्रिमंडळाच्या 401 बैठकांबाबतची माहिती असलेली एक सीडीही बॅनर्जी यांनी जारी केली. यात 'भारत छोडो' चळवळ, बंगालमधील भीषण दुष्काळ आणि बंगालची फाळणी यांसारख्या महत्त्वाच्या घटनांचाही समावेश आहे. यापूर्वी राज्य सरकारने नेताजींशी संबंधित 64 फायली खुल्या केल्या होत्या. या फायलींच्या डिजिटायझेशनचे काम 2013 साली सुरू झाले होते. 1947 नंतरच्या 10 वर्षांमधील मंत्रिमंडळ बैठकीच्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन सध्या सुरू असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या.

 •  सेबी-वायदे बाजार आयोग विलीनीकरण🔵


केंद्र सरकारी अधिकारी व कर्मचारी म्हणून दर्जा मिळणार आहे-कर्मचाऱ्यांनाही सामावून घेण्याचा निर्णयदेशातील वस्तू व कृषी जिन्नस वायदे बाजार आणि भांडवली बाजारावर सामायिक नियमनाच्या रचनेसाठी सेबी आणि वायदे बाजार आयोग (एफएमसी) यांच्या विलीनीकरणानंतर एकत्रित कारभार येत्या सोमवारपासून सुरू होईल. तथापि विलीनीकरणानंतर सध्या एफएसीच्या सेवेत असलेले सात व्यवस्थापकीय अधिकारी व अन्य४१ कर्मचाऱ्यांना सेबीच्या सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना केंद्र सरकारी अधिकारी व कर्मचारी म्हणून दर्जा मिळणार आहे.वस्तू वायदे बाजाराची नियंत्रक असलेले एफएमसी आणि भांडवली बाजाराची नियंत्रक सेबी यांचे विलीनीकरण दोन दिवसांवर येऊन ठेपले तरी सध्या एफएमसीच्या सेवेत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा अखंडतेबाबत अनिश्चितता कायम होती. तो प्रश्न मार्गी लावताना, सात संचालक पातळीवरचे अधिकारी आणि ४१ कर्मचाऱ्यांना तेएफएमसीच्या सेवेत रुजू होताना निश्चित झालेल्या कालावधीपर्यंत सेबीच्या सेवेत सामावून घेण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहीर केला. २९ सप्टेंबरपासून ते नव्या सेवेत कार्यभार स्वीकारतील, असे अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनेने स्पष्ट केले आहे.सध्याच्या घडीला देशात १२ मान्यताप्राप्त वस्तू बाजारमंच (कमॉडिटी एक्स्चेंज)असून, त्यापैकी निम्मे म्हणजे सहाच कार्यरत आहेत. या सहा कार्यरत बाजारमंचांपैकी तीन राष्ट्रीय स्वरूपाचे तर तीन प्रादेशिक स्वरूपाचे आहेत. या सर्वाचे नियमन आजवर एफएमसीकडून पाहिले जात होते, ते आता सेबीद्वारे स्थापित कमॉडिटी सेलद्वारे पाहिले जाणार आहे.

 • क्‍लाउड कॉम्प्युटिंग डेटा सेंटर्स "डिजिटल महाराष्ट्रा"साठी मैलाचा दगड :

मायक्रोसॉफ्ट या कंपनीने स्थापन केलेली पुणे आणि मुंबई येथील क्‍लाउड कॉम्प्युटिंग डेटा सेंटर्स "डिजिटल महाराष्ट्रा"साठी मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मायक्रोसॉफ्टच्या या दोन डेटा सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी मायक्रोसॉफ्टचे भारतातील मुख्य व्यवस्थापक भास्कर प्रामाणिक उपस्थित होते. मायक्रोसॉफ्ट या कंपनीने भारतात पुणे, मुंबई आणि चेन्नई येथे ही डेटा सेंटर उभारली आहेत. या केंद्राची भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्व देशांमधील माहिती ठेवण्याची क्षमता आहे. या केंद्रामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. सेवा क्षेत्रात पूरक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत तसेच या केंद्रांच्या मदतीने सरकारी कार्यालये जनतेस देणाऱ्या सेवा अधिक वेगाने देण्यास समर्थ होतील.

 • एसीबी महासंचालक प्रवीण दीक्षित यांची नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड :

बुधवारी सेवानिवृत्त होत असलेले संजीव दयाल यांच्या जागी भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक प्रवीण दीक्षित यांची नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या नियुक्त्यांना मंजुरी दिली. महामंडळ सुरक्षा विभागाचे प्रमुख विजय कांबळे हे एसीबीचे प्रमुख असतील. पोलीस गृहनिर्माण विभागाचे महासंचालक अरुप पटनायक सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी सतीश माथूर यांची नियुक्ती झाली आहे. तसेच विधी आणि तांत्रिक विभागाच्या महासंचालकपदी मीरा बोरवणकर यांना बढती देण्यात आली आहे. प्रवीण दीक्षित हे 1977 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. एसीबीचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी गेल्या दोन वर्षांत भ्रष्ट व लाचखोरांविरुद्ध धडक मोहीम उघडली. दीक्षित पुढच्या वर्षी 31 जुलैला सेवानिवृत्त होतील. 2012 पासून पोलीस महासंचालक होते.

 • 👉🏼शासनाने ऑनलाईन दस्तनोंदणी केली सुरू :

दस्तनोंदणी गतिमान व पारदर्शक करण्यासाठी शासनाने ऑनलाईन दस्तनोंदणी सुरू केली. यामध्ये आता पुढचे पाऊल टाकून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने के्रडिट कार्ड वा कॅश कार्डद्वारेदेखील दस्तनोंदणीचे मुद्रांक शुल्क भरता येणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबीची पूर्तता झाली असून, येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात ही सुविधा सुरू होईल, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक एन. रामास्वामी यांनी दिली. मुद्रांक शुल्क विभागात विविध कागदपत्रांसाठी अंतर्गत चलन भरावे लागते. त्याचे शुल्क रोख द्यावे लागते. ते रोख न देता ऑनलाईन जमा करण्यासाठी मुद्रांक शुल्क विभाग प्रयत्नशील आहे.

 • ‘आयएनएस कोची’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

अत्याधुनिक अशा स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली आयएनएस कोची ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते बुधवारी मुंबईतील माझगाव गोदीत या नौकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुंबईत नौदलाच्या माझगाव गोदीत या युद्धनौकेची बांधणी करण्यात आली आहे. आएनएस दिल्ली क्लास नंतर आएनएस कोलकाता क्लास मधील ही दुसरी महत्वाची युद्धनौका आहे. ही युद्धनौका स्टेल्थ प्रकारतील म्हणजे शत्रूच्या रडारवर न दिसणारी आहे. तसेच या युद्धनौकेवर २५० ते ३०० किलोमीटरील लक्ष्याचा अचूक भेद करू शकणारी १६ ब्रम्होस क्षेपणास्त्र तैनात आहेत. अत्याधुनिक संदेश यंत्रणा, मशिनगन आणि इतर सुविधा असल्याने या युद्धनौकेमुळे भारतीय समुद्रकिनार्‍यांची सुरक्षा मजबूत होणार आहे. जगातील मोजक्या युद्धनौकांप्रमाणे जमिनीवरील लांब अंतरावरच्या एखाद्या लक्ष्यावर हवेतून अचूकपणे मारा करण्यासाठी थ्रेट अलर्ट रडार आणि मल्टी-फंक्शन सर्व्हायलन्सची सुविधा आयएनएस कोचीवर उपलब्ध आहे.
आयएनएस कोचीची वैशिष्ट्ये

 1. १६४ मीटर लांबी, १७ मीटर रुंद
 2. ७५०० टन वजन, ३० किमी प्रतिवेग
 3. पूर्णपणे स्वदेशी बनावट
 4. शत्रूंच्या रडारला चुकवण्याची क्षमता असलेले स्टेल्थ तंत्रज्ञान
 5. ३० अधिकार्‍यांसह ३५० जवान तैनात करण्याची क्षमता
 6. युद्धनौकेत सिकिंग आणि चेतकसारखे हेलिकॉप्टर्स तैनात करण्याची क्षमता आहे . • थोडक्यात महत्वाचे :

•55व्या खुल्या राष्ट्रीय ऍथलेटिक्सा स्पर्धेत भारतीय रेल्वेने
267 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले

•मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान
बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तुरूंगवासाची
शिक्षा झालेल्या अभिनेता संजय दत्तची शिक्षा माफ
करण्यासंबंधीची याचिका राज्यपाल सी. विद्यासागर राव
यांनी फेटाळून लावला

•एसबीआय कार्ड या भारतातील अग्रणी क्रेडिट कार्ड दाता
संस्थेने भारतातील सर्वात मोठय़ा सात इ-कॉमर्स अग्रणी
संस्थांशी भागिदारी केली

•भारतात आर्थिक सुधारणा वेगाने घडवण्यात येतील व त्यामुळे
गेल्या वर्षीच्या ७.३ टक्के या वाढीच्या दरापेक्षा जास्त
आर्थिक वाढ दर गाठला जाईल, असे सांगून अर्थमंत्री अरुण
जेटली याने स्पष्ट केले

•आयडीएफसी बँकेचा व्यवसाय येत्या १ ऑक्टोबरपासून
देशभरात २३ शाखांसह सुरुवात

•मुंबईस्थित आघाडीची निधी हस्तांतरण व देयक भरणा सुविधा
असलेल्या सुविधा इन्फोसव्र्हने पॉइंट ऑफ सेल (पीओएस)
उपकरणांच्या निर्मितीतील संपूर्ण स्वदेशी नवउद्यमी कंपनी
‘आसानपे’वर ताबा मिळविल्याची घोषणा केली

•न्यायालयांवर पडणारा ताण हलका करण्यासाठी मध्य प्रदेश
सरकारने गेल्या १० वर्षांत विविध कलमान्वये दाखल केलेले १.८४
लाख खटले मागे घेतले

•राष्ट्रविरोधी कारवायांसाठी करण्यात येणाऱ्या
माहितीच्या देवाणघेवाणीवर नियंत्रण मिळविण्यासाठी
जम्मू-काश्मी्र सरकारने ईदच्या पार्श्ववभूमीवर राज्यातील
इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला

•राज्याच्या काही भागात पडलेला तीव्र दुष्काळ, काही
ठिकाणी झालेला अवकाळी पाऊस आदि कारणांनी
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी ऊस क्षेत्रात तब्बल 1 लाख
हेक्टकरनी घट झाली

•दिल्ली, मुंबई आणि कोलकता, त्याचप्रमाणे मुंबई आणि चेन्नई
या महानगरांना जोडणाऱ्या हीरक चतुष्कोन (डायमंड
क्वाड्रिलॅटरल) या महत्त्वाकांक्षी रेल्वे कॉरिडॉर
प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी रेल्वेने चीन, फ्रान्स
आणि स्पेनमधील कंपन्यांची निवड केली

•सर्वसामान्य गटासाठी गुजरात सरकारने विशेष पॅकेजची
घोषणा केली

•लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने "थ्री डी'
व्हिडिओची अनुभूती देणारे, 360 अंशांत फिरणारे व्हिडिओ
सादर केले

•तिरुमला तिरुपती देवस्थानाने यापुढे गेल्या अनेक वर्षांपासून
सुरू असलेल्या परंपरेला छेद देत देवपूजेसाठी ब्राह्मणेतर लोकांना
प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी बोइंग
कंपनीकडून 22 अपाची आणि 15 चिनूक हेलिकॉप्टर घेण्याच्या
निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने
(सीसीएस) शिक्कामोर्तब केले

•तेल व डाळींसह जीवनावश्याक वस्तूंच्या किमती नियंत्रणात
राहाव्यात व सणासुदीच्या दिवसांत त्या कडाडू नयेत
यासाठी जीवनावश्यसक वस्तू व्यापार नियंत्रण आदेशाला
एका वर्षाने म्हणजे 30 सप्टेंबर 2016 पर्यंत मुदतवाढ देण्याचा
निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला.

•इतर देशांच्या भूमीवरही लष्करी कारवाई करण्यास संमती
देण्याच्या प्रस्तावावर जपानच्या संसदेने शिक्कामोर्तब केले.
यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच जपानच्या लष्कराला
अशी परवानगी मिळाली.
___________________________________________________________________________________