Post views: counter

यशाचे समान सूत्र key to success


                               एकदा एका यशवंताला विचारले की, आपल्या यशाचे रहस्य काय? तेव्हा त्याने उत्तर दिले, 'जितके यशवंत, तितकी सूत्रे असतात' प्रत्येकात समान धागा म्हणजे सातत्य, जिद्द, चिकाटी आणि 'स्मार्ट वर्क'. तरी या स्पर्धेची काही सूत्रे या तिन्ही परीक्षांना लागू आहेत. आज त्यांचा आपण विचार करूया.

                             स्पर्धापरीक्षा द्यायची म्हणजे सुरुवात कशी करायची हा अनेकांना भेडसावणारा प्रश्न असतो. अनेक जण एका मोठा ठोकळा घेऊन भारंभार वाचयला सुरुवात करतात. असे न करता एकदा परीक्षा द्यायची ठरवली की, त्या परीक्षेचा अभ्यासक्रम शब्दशः पाठ करा. याचा फायदा असा होतो की, आपण २४ तास अॅलर्ट असतो आणि एखादी महत्त्वाची घटना घडली की, त्याची नोंद ठेवू शकतो. तसेच पुस्तके खरेदी करतानाही त्याचा फायदा होतो. पीएसआय (PSI), एसटीआय (STI) आणि
एएसएसटी (ASST) या परीक्षांचा फायदा असा आहे की, अभ्यासक्रमाचा बराचसा भाग तिन्ही परीक्षांसाठी समान आहे. यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. यानंतर २०१३पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिकांचे (पूर्व आणि मुख्य) अवलोकन करावे. यावरून अभ्यासाची दिशा निश्चित होण्यास मदत होईल. सध्या विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांच्या स्वरूपावर एक नजर टाकूया.


पूर्वपरीक्षा

                      पूर्वपरीक्षेत आता फक्त वस्तुनिष्ठ माहिती लक्षात ठेवून फायदा नाही. त्याच्या आसपासची माहितीही माहीत असावी. उदा. नुकतेच निधन झालेले भारताचे माजी राष्ट्रपती कोण? अशा प्रकारे प्रश्न आधी विचारला जायचा आता 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल खालील विधाने लक्षात घ्या,' असा प्रश्न विचारून चार पर्याय दिलेले असतात, त्यातून योग्य पर्याय निवडायचे असतात. हे पर्याय एक किंवा अधिक असू शकतात. एखादा आयोग स्थापन झाला असेल, तर त्याचे अध्यक्ष, आयोगाने सुचवलेले महत्त्वाचे बदल, सदस्य यांची माहिती हवी. गेल्या एक वर्षात चर्चेत असलेली पुस्तके, शासकीय संस्थांचे प्रमुख, स्वातंत्र्याच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना, काही स्वातंत्र्यसैनिकांनी केलेली विधाने, या काळात लिहिलेली पुस्तके आणि लेखक, भूगोलात महाराष्ट्राचा सामाजिक, आर्थिक, प्राकृतिक भूगोल आणि त्यावर आधारित चालू घडामोडी यावर आधारित प्रश्न विचारले जातात. सामान्य विज्ञानात भौतिक, रसायनशास्त्र या विषयातील मूळ संकल्पना, त्यांचा दैनदिन जीवनातील वापर, व्याख्या, जीवशास्त्र, मानवी आरोग्य, यांच्यावर प्रश्नाचा रोख असतो. त्यासाठी पाचवी ते दहावीची विज्ञानाची पाठ्यपुस्तके वाचावीत. बुद्धिमापन आणि अंकगणिताच्या प्रश्नांची काठिण्यपातळी वाढते आहे. तेव्हा अगदी पद मिळेपर्यंत सराव करायला हरकत नाही.

मुख्य परीक्षा
आधी पोळी आणि मग फोडणीची पोळी या न्यायाप्रमाणे आधी पूर्व आणि मग मुख्य असा अभ्यास करावा. कारण जास्तीत जास्त भाग पूर्व परीक्षेत झालाच असतो. आता गरज आहे मराठी आणि इंग्रजी व्याकरणाच्या फोडणीची. हा विषय मुख्य परीक्षेत अतिशय महत्त्वाचा आहे. कारण निकाल देताना अटीतटीची वेळ येते, तेव्हा याच विषयांचे गुण विचारात घेतले जातात. त्यामुळे या विषयांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपली मातृभाषा मराठी आहे म्हणजे आपल्याला मराठी येते किंवा शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच झाल्याने हे व्याकरण वगैरे आपल्या डाव्या हातचा मळ आहे, हा गैरसमज मनातून काढून टाका. कारण बोली भाषा आणि स्पर्धेची भाषा यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे लक्षात घ्या. या विषयांचा अभ्यास करताना अगदी मुळाक्षरापासून सुरुवात केली, तरी हरकत नाही. नंतर व्याकरणाचे नियम समजून भरपूर सराव करावा. हे दोन्ही विषय गणितासारखे असून, त्यात पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. जास्तीत जास्त वाक्प्रचार आणि म्हणी यांचे अर्थ पाठ करावे. इंग्रजी व्याकरणाचाही सराव करावा. तसेच दर्जेदार मराठी आणि इंग्रजी साहित्याचे वाचन करावे. त्यांनी परिच्छेदाचे प्रश्न सोडवणे सोपे होईल. जी गोष्ट मराठीसाठी, तोच न्याय इंग्रजीसाठी बाकी सामान्य अध्ययनाचा भाग पूर्वपरीक्षेत तयार असतोच. मुख्य परीक्षेतील पोलिस कायदा, माहितीचा अधिकार, माहिती तंत्रज्ञान हे विषय तयार झाले की, यशाची रेसिपी तयार.

हे लक्षात ठेवा
  1. आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे या परीक्षाही आव्हानात्मक आहेत. तेव्हा अभ्यासाचे योग्य नियोजन करावे.
  2. भारंभार पुस्तके खरेदी करू नयेत, दहा पुस्तके वाचण्यापेक्षा एकच पुस्तक दहा वेळा वाचावे
  3. शक्यतो स्वतःच्या नोट्स तयार कराव्यात ज्या शेवटपर्यंत तुमच्या कामास येतील.
  4. परीक्षेसाठी योग्य तीच पुस्तके वाचावीत.
  5. अवांतर वाचन करताना आपला वेळ फार जात नाही ना याची काळजी घ्यावी.

  6. सध्याचा काळात ६०-७०% अभ्यास हा इंटरनेटच्या सहाय्याने होतो. पण हे करताना फेसबुक, ट्विटरवर आपला वेळ वाया घालवू नये.
  7. एखादा अभ्यासाचा एक गट असेल, तर नियमित गटचर्चा करावी, त्यामुळे नवनवीन गोष्टी कळतात.
  8. वेळोवेळी आपल्या प्रगतीचा आढावा घेत राहा.
  9. परीक्षेआधी प्रश्नपत्रिकांचा सराव करा.
  10. तिन्ही परीक्षांना बसणार असाल, तर एकूण आठ परीक्षा द्याव्या लागतात. त्याचे योग्य नियोजन करा.
  11. 'कट ऑफ' हा सगळ्या स्पर्धकांचा आवडता विषय आहे. त्यासंबंधी माहिती जरुर असावी पण त्यात गुरफटून जाऊ नये.
  12. अभ्यास चांगला असेल, तर 'कट ऑफ'ची काळजी करण्याची आवश्यकताच भासणार नाही.

- रोहन नामजोशी
(स्पर्धा परीक्षा तज्ञ)

Source: www.mtonline.in

२ टिप्पण्या: