Post views: counter

MPSC अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण


                              अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण राज्य सरकारने पूर्णपणे नव्या संरचनेत, राज्यसेवेतून मिळालेल्या पदानुसार व बदलत्या काळानुसार समर्पक असे उभे केले आहे. त्याला एकत्रित परीक्षाविधिन प्रशिक्षण कार्यक्रम (Combined Probationary Training Program) असे म्हटले जाते. त्याचे उद्दीष्ट राज्यस्तरीय दृष्टिकोन, नैतिक प्रमाणके व मूल्यव्यवस्था निर्माण करणे हा आहे. सर्व राज्यांतील विविध सेवांमधील प्रशिक्षणार्थीचे एकाच ठिकाणी प्रशिक्षण झाल्याने त्यांच्यात सहयोगाची भावना निर्माण व्हावी हाही उद्दीष्ट आहे. प्रशिक्षण क्लासरूम व प्रत्यक्ष क्षेत्रात (field work) असे दुहेरी पद्धतीने दिले जाते. त्यातून शिस्तबद्ध, व्यावसायिक व लोककेंद्री असे सनदी अधिकारी निर्माण व्हावेत याची काळजी घेतली जाते. 


प्रशिक्षणाचे अंतरंग 
                                हा कार्यक्रम दोन वर्षांचा असतो. त्यात फाऊंडेशन टप्पा असतो. तांत्रिक शिक्षण असते, गाव व आदिवाशी भागांना भेट असते, न्यायपालिका, कायदेमंडळ, शस्त्रप्रशिक्षण, सैनिकी छावणी या सर्वांना भेट देऊन त्यांच्या कार्याचा प्रत्यक्ष परिचय करून घेतला जातो. विविध जिल्ह्यातही प्रशिक्षण दिले जाते. पाचगणी येथे असलेल्या खास केंद्रात सरकारी सेवेत आवश्यक असलेली नैतिकता, मूल्यव्यवस्था यांचे महत्त्व बिंबवले जाते. जसे केंद्रीय सेवेतील अधिकाऱ्यांचे भारत दर्शन घडवले जाते. त्याच धर्तीवर राज्य सेवा अधिकाऱ्यांना महाराष्ट्र दर्शन घडवले जाते. इतकेच काय तर दिल्लीलाही नेऊन तिथल्या कार्यपद्धतीचा परिचय करून दिला जातो. 

यशदा येथील प्रशिक्षण 
                              सध्या CPTP - 2015 ही दुसरी बॅच यशदा येथे चालू आहे. त्यात 'अ'मधील अधिकाऱ्यांचा समावेश होतो. त्यात एकूण ८५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात ६० पुरुष अधिकारी २५ महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एकूण सहा प्रकारचे अधिकारी 
यशदा येथे प्रशिक्षण घेत आहेत. यशदा म्हणजे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे. जी राज्य सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी प्रमुख संस्था आहे. हे सहा अधिकारी म्हणजे उपजिल्हाधिकारी (४०), पोलिस उपअधीक्षक (२१), तहसीलदार (३२), सहाय्यक विक्रिकर आयुक्त (४), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (६) व महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा अधिकारी (३). १२५पैकी ६८ अधिकारी प्रशिक्षणाला रुजू झाले आहेत. 

दिवसाचे नियोजन 
                             या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा (Officers Trainee) यशदा येथील दिवस सकाळी ६ वाजता सुरू होतो. त्यात सुरुवातील चार किमीचे जॉगिंग, ३० मिनिटांचा मैदानी व्यायाम असतो. आठ वाजता नाश्ता उरकून नऊ वाजता क्लासरूममधील वर्ग सुरू होतात. अर्धभागात प्रत्येकी ६० मिनिटांच्या चार तासिका पहिल्या असतात. दुपारच्या जेवणानंतर पुढच्या सत्रात गेस्ट लेक्चर्स, कम्प्युटर व इंग्रजी याचे वर्ग असतात. वेळोवेळी प्रशिक्षणार्थींची गटचर्चा होते, केसस्टडी दिल्या जातात. गटांचे सादरीकरण केले जाते. संध्याकाळी एक तास मैदानी खेळ खेळले जातात. रविवारी व इतर सुट्ट्यांच्या दिवशी इतर काही गोष्टींचे नियोजन केले जाते. जसे एखाद्या समाजसेवी संघटनेत जाऊन काम करणे, डोंगरयात्रा इत्यादी. या प्रकारे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवून अधिकाऱ्याचा जोम वाढवला जातो. लेक्चर हॉल व पुस्तकांच्या पलिकडे जाऊन जीवनाचा आनंद घेणे व निसर्गाशी समरसता साधणे यासाठी प्रशिक्षण कालावधीत विशेष जोर दिला जातो. त्यासाठी यशदामध्ये अद्ययावत व्यायामशाळा, योगा हॉल, व्हॉलिबॉल मैदान या सर्वांची सोय आहे. 

वनामती येथील प्रशिक्षण 
                        गट 'ब' प्रकारच्या पदांचा प्रशिक्षण कार्यक्रम (CPTP) हा वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था वनामती, नागपूर येथे घेतला जातो. तो यशदातील कार्यक्रमाप्रमाणेच असतो. तिथेही दुसरी बॅच यावर्षी सुरू आहे. हे केंद्रही प्रशिक्षणाच्या सोयींनी परिपूर्ण आहे. वनामती येथे प्रशिक्षणासाठी रुजू झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे. सहायक गट विकास अधिकारी (३०), उपअधीक्षक भूमी अधिलेख (१०), सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क (१), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (३), सहायक निबंधक सहकारी संस्था (४), उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क (१), नायब तहसीलदार (१३२). निवडलेल्या ३१२पैकी १८२ अधिकारी रुजू झाले आहेत. प्रशिक्षणात लोक व विकास प्रशासन, कायदा व न्यायव्यवस्था, अर्थशास्त्र व वित्तीय व्यवस्थापन, वर्तवणूक शास्त्र, कार्यालय प्रशासन, ई-गव्हर्नन्स यांचा समावेश असतो. असा हा दोन वर्षांचा कार्यक्रम व्यक्तिमत्वाला पैलू पाडून अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडायला सक्षम करतो. 

Source: www.mtonline.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा