Post views: counter

सुकन्या योजना : Sukanya Yojana

सुकन्या योजना

 महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. देशात मुलींची पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केली. महाराष्ट्राचा हा प्रागतिक विचार जोपासून राज्यात मुलींचे शिक्षण आणि आरोग्यात सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे तसेच मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण करुन बालविवाह रोखणे, मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात सुकन्या योजना शासनाने 13 फेब्रुवारी 2014 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयान्वये 1 जानेवारी 2014 पासून लागू केली आहे.

योजनेची वैशिष्ट्ये
  • या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखाली जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे शासन 21 हजार 200 रुपये आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवणूक करणार आहे.
  • त्यानंतर या मुलीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक लाख रुपये तिला मिळणार आहेत.
  • आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेतून नाममात्र 100 रुपये प्रतिवर्ष इतका हप्ता जमा करुन या मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरविला जाईल.
  • ज्यात पालकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना रक्कम अदा करण्यात येईल.
  • त्यात नैसर्गिक मृत्यूसाठी 30 हजार रुपये, अपघातामुळे मृत्यू 75 हजार रुपये, डोळे, अवयव निकामी होणे 75 हजार रुपये व एक डोळा व एक अवयव निकामी होणे 37 हजार 500 रुपये इतकी रक्कम देय असेल.
कसा मिळवाल लाभ
  • या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पालकांनी विहित नमुन्यातअर्ज करावा.
  • वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र
  •  मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
  • दारिद्र्यरेषेखालील असल्याचा पुरावा
  • दुसऱ्या अपत्यासाठी अर्ज करताना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याबाबतचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तिची जन्म नोंद झाल्यावर अंगणवाडी सेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज करता येईल.
शिक्षणासाठी मदत
  • या योजनेअंतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोगासाठी सदर मुलीला 600 रुपये इतकी शिष्यवृत्ती दर सहा महिन्यांनी नववी, दहावी, अकरावी आणि बारावीमध्ये शिकत असताना दिली जाईल.
  • विहित मुदतीपूर्वी म्हणजे वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच मुलीचा विवाह केल्यास वा तिचा मृत्यू झाल्यास या योजनेअंतर्गत मुलीच्या नावे बॅंक खात्यात जमा असणारी रक्कम शासनाच्या खात्यात जमा होईल.
  • या योजनेसाठी आयुर्विमा महामंडळ स्वतंत्र पॉलिसी काढतील. त्यात प्रत्येक लाभार्थी मुलीसाठी स्वतंत्र खाते असेल.
योजनेची पात्रता
  • ही योजना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी कुटुंबातील फक्त दोन अपत्यांपर्यंत लागू असेल.
  • लाभ मिळविण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण, दहावी उत्तीर्ण व 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक आहे.
  • दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्यास त्या दोन्ही मुली या योजनेस पात्र असतील.
  • एखाद्या परिवाराने अनाथ मुलीस दत्तक घेतल्यास त्या मुलीस प्रथम मुलगी मानून तिलाही या योजनेचा लाभ दिला जाईल.
  •  बालगृहातील अनाथ मुलींसाठीही योजना लागू असेल.
  • अर्जात काही अपूर्णता असल्यास संबंधितांनी त्याबाबत पालकांना 15 दिवसांचे आत कळवून त्यांच्याकडून पूर्तता करुन घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत कोणताही अर्ज दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही. 
  • मुलींच्या जन्माबाबत समाजाने आपला दृष्टिकोन व्यापक ठेवून या योजनेचा लाभ घ्यावा.

२ टिप्पण्या: