Post views: counter

Current Affairs August 2016 Part - 1


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹स्पर्धा परीक्षांची पुस्तके आता ब्रेल , ऑडिओमध्येही

प्रज्ञाचक्षू (अंध) मुलांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे सोपे जावे यासाठी दीपस्तंभ फाउंडेशनच्या " मनोबल ' या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रथमच ब्रेल आणि ऑडिओ स्वरूपात स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या आगळ्या उपक्रमाचा लाभ परीक्षांची तयारी करणाऱ्या असंख्य प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांना होत आहे . असा प्रयोग करणारी "दीपस्तंभ ' ही पहिली संस्था ठरली आहे .

अंध, अपंग आणि कर्णबधिर मुलांनादेखील स्पर्धा परीक्षा देता याव्यात, त्यांच्यातून चांगले अधिकारी घडावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यजुर्वेंद्र महाजन यांनी "मनोबल ' हा आगळा उपक्रम साकारला . मनोबलमध्ये आजमितीस विविध ठिकाणचे विद्यार्थी निवासी आहेत. या विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेतली जाते. चतुर्थ वर्ग ते प्रथम दर्जाचा अधिकारी होण्यासाठी जी पुस्तके आवश्यक असतात ती सर्व पुस्तके "मनोबल ' मध्ये ब्रेलमध्ये उपलब्ध आहेत. मुंबईच्या ब्रेल लिपी प्रकाशन आणि पुण्याच्या निवांत प्रकाशनाने ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. यामध्ये चालू घडामोडी , इंग्रजी, इतिहास , अर्थशास्त्र , समाजशास्त्र आदी विषयांच्या पुस्तकांचा समावेश आहे . विशेष म्हणजे ही पुस्तके हिंदी , मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांत आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आनंदीबेन यांना हवी स्वेच्छानिवृत्ती

गुजरातचे नेतृत्व नव्या दमाच्या नेत्याकडे देण्याची वेळ आली असल्याचे सांगत मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखविली आहे . हे पत्र पक्षश्रेष्ठींकडे पाठवून नंतर "फेसबुक' द्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

" मी नोव्हेंबरमध्ये वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करत आहे . त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि 2017 मधील व्हायब्रंट गुजरात परिषदेपूर्वी राज्याला नवे नेतृत्व मिळणे आवश्यक आहे ,' असे आनंदीबेन पटेल यांनी " फेसबुक' वर म्हटले आहे . 75 वर्षे पूर्ण केलेल्या नेत्यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घ्यावा , असे भाजपचे धोरण आहे . पदमुक्त करण्याची विनंती दोन महिन्यांपूर्वीच पक्षनेतृत्वाला केली असल्याचे आनंदीबेन यांनी सांगितले . राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड केल्याबद्दल आनंदीबेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या तुलनेत प्रभावीपणे काम करता आले नसले तरी त्यासाठी पूर्ण प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे .

गेल्या वर्षी झालेले पाटीदार समाजाचे आंदोलन आणि त्यानंतर हार्दिक पटेलच्या अटकेवरून झालेला वाद यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहा हे आनंदीबेन यांच्यावर नाराज असल्याचे चित्र होते. मंत्रिमंडळावरही त्यांचे नियंत्रण नसल्याचे सांगितले जात होते . तसेच , नुकत्याच राज्यात झालेल्या दलित मारहाण प्रकरणानंतर भाजप सरकारवर टीकाही झाली होती .

निर्णय पक्षाच्या बैठकीत
आनंदीबेन यांनी पाठविलेला राजीनामा मिळाला असून उद्या ( ता. 2 ) होणाऱ्या पक्षाच्या संसदीय बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल , असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज सांगितले . वयाची 75 वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांना पद सोडायचे आहे . असे करून त्या चांगला पायंडा पाडत असल्याचे शहा यांनी सांगितले .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सर्वांत लांब बोगद्याची इंफाळमध्ये पायाभरणी

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि मणिपूरचे मुख्यमंत्री ओक्राम इबोबी सिंह यांनी काल येथे रेल्वे बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन केले. हा 11 .55 किमी लांबीचा बोगदा बांधून झाल्यावर तो देशातील सर्वांत लांब रेल्वे बोगदा असणार आहे .

जिरीबाम ते इंफाळ सेक्टर या दरम्यान हा बोगदा असेल. याच सेक्टरमध्ये इंरिंग नदीवर तब्बल 141 मीटर उंच रेल्वे पूलही बांधण्यात येणार आहे . जवळपास दोन कुतूबमिनारच्या उंचीइतका हा पूल जगातील सर्वांत उंच रेल्वेपूल ठरणार आहे . रेल्वेमंत्री प्रभू यांनी येथील येरुम्बम रेल्वे स्थानकाचीही पायाभरणी केली . 8 .7 कोटी खर्चून बांधण्यात येणारे हे स्थानक सर्व सोयीसुविधांनी सज्ज असेल.
 याशिवाय , इंफाळ ते मोरेह स्थानकापर्यंत रेल्वेमार्ग उभारण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निश्चय असून , यासाठी 9 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे . अर्थ मंत्रालयाकडे पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रभू यांनी दिले आहे .

2020 वर्षापर्यंत ईशान्य भारतातील सर्व राज्यांच्या राजधान्या ब्रॉड गेजने जोडण्याचा रेल्वे मंत्रालयाचा संकल्प असून , त्या दृष्टीने वेगाने काम सुरू आहे . जिरीबाम ते तुपूळ ते इंफाळ हा रेल्वेमार्ग 111 किमीचा असून , याचे काम 2008 मध्ये सुरू झाले होते. आतापर्यंत 12 .5 किमी काम पूर्ण झाले आहे . तुपूळपर्यंत या मार्गावर 37 बोगदे असून आतापर्यंत 25 बोगद्यांचे काम पूर्ण झाल्याची माहिती प्रभू यांनी दिली . हा रेल्वेमार्ग मोरेह या सीमेवरील गावापर्यंत वाढविण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी प्रभू यांना केली आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रिओ ऑलिंपिक पदकाच्या निर्मितीची आगळी कहाणी

सोन्यापेक्षा कोणती गोष्ट भारी किंवा " महाग' असू शकते याचे उत्तर एरवी मिळणार नाही ; पण ऑलिंपिकचा संदर्भ असल्यास विचार करायची गरज नाही. ऑलिंपिकचे सुवर्णच नव्हे तर रौप्य आणि अगदी ब्रॉंझपदकसुद्धा सोन्यापेक्षा " बहुमोल ' असते ! रिओ ऑलिंपिकच्या संयोजकांनी पदकाची निर्मिती करताना हाताने बनविलेला साचा , पुनर्वापर केलेल्या वस्तू अशी वैशिष्ट्ये साधली आहेत. मुख्य म्हणजे ऑलिंपिक पदकांची निर्मिती करताना कला आणि शास्त्राचा संगम साधण्यात आला आहे . 100 जणांचे पथक ब्राझीलमधील टांकसाळीत गुप्तपणे हे काम करीत आहेत. पाच हजारांपेक्षा जास्त पदके तयार करण्याचे काम पूर्णत्वास येत आहे . या पथकात शिल्पकारांप्रमाणेच मशिन ऑपरेटर्सचा समावेश आहे . पदकांचा साचा बनविण्याचे काम नेल्सन नेटो कार्नेरिओ या शिल्पकाराने केले. त्यांची प्रतिक्रिया बोलकी आहे . "" विजयमंचावर हे पदक क्रीडापटू गळ्यात घालतील तेव्हा जणू काही मीच पदक जिंकल्यासारखे वाटेल ,'' असे त्यांनी म्हटले आहे . टांकसाळीत 41 वर्षे नोकरी केलेल्या कार्नेरिओ यांनी अगणित नाणी पाडली आहेत . ते आता 60 वर्षांचे आहेत. ऑलिंपिक पदकांच्या निर्मितीमुळे व्यावसायिक कारकीर्दच नव्हे तर एकूणच जीवन सार्थ झाल्यासारखे त्यांना वाटते . वास्तविक कार्नेरिओ यांना संगणकाचा वापर करून साचा तयार करता आला असता, पण त्यांनी दोन आठवडे अहोरात्र मेहनत करून हाताने साचा घडविला . त्यामुळे डिझाईन मनासारखे काढता आले. हाताने जे काही घडवू त्याची सर दुसऱ्या कशाला येणार नाही , असे त्यांनी म्हटले आहे .

हा साचा संगणकावर स्कॅन करण्यात आला . त्यानुसार संगणकावर नियंत्रित होणाऱ्या मशिनवर त्या साच्यात पदक घडविले जाते. धातूचा हा भाग मायक्रोस्कोपखाली गुणवत्ता दर्जासाठी तपासला जातो . त्यानंतर तो टांकसाळीत पाठविला जातो . 550 टन शक्तीचा वापर करून साच्यानुसार पदक तयार होते . सुवर्णपदक तयार करताना सोन्याचा मुलामा दिला जातो . सुवर्णपदकामध्ये सोन्याचे प्रमाण किती याची उत्सुकता असणे स्वाभाविक आहे . तर याची माहिती अशी आहे , की यात 494 ग्रॅम चांदी आणि सहा ग्रॅम सोने आहे . आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लंडनच्या तुलनेत रिओ ऑलिंपिक पदकांचे वजन 20 टक्के जास्त आहे . पदकांमध्ये चांदीचे प्रमाण जास्त आहे . त्यातील बहुतांश चांदी जुने आरसे, एक्स - रे प्लेट्सचा पुनर्वापर करून मिळविण्यात आली . 2004 च्या अथेन्स ऑलिंपिकपासून पदकाच्या एका बाजूचे डिझाईन सारखे असते . त्यात ग्रीक देवता नाईके दाखविण्यात येते . कार्नेरिओ यांनी ही देवता रेखाटताना ती ब्राझीलियन तरुणीसारखी वाटावी म्हणून काही छोटे पण महत्त्वाचे बदल केले आहेत . तिच्या मागील बाजूला पॅंथीऑन मंदिर आहे . पदकाच्या दुसऱ्या बाजूला रिओ ऑलिंपिकचा लोगो आणि खेळाचा तपशील आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹माराकाना सज्ज , रिओ उदासीन

" बेम विंदो रिओ ' - रिओमध्ये तुमचे स्वागत आहे . हा फलक लक्षवेधी ठरत असला तरी रिओ शहराला अजूनही ऑलिंपिकची पूर्ण जाग आलेली दिसत नाही . रिओच्या जीआयजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थोडी लगीनघाई दिसून येत असली तरी आपण शहरात प्रवेश केल्यानंतर ऑलिंपिकचे चैतन्य शहरी भागात अजून कोठेच प्रकटले नाही . अपवाद आहे तो माराकाना स्टेडियमचा परिसर आणि खेळाडूंचे दुसरे घर बनलेले क्रीडाग्राम . बीजिंग आणि लंडन स्पर्धेत सर्वत्र ऑलिंपिकची धूम स्पर्धेपूर्वीच साऱ्या शहरात पसरली होती तसा अनुभव रिओमध्ये दिसत नाही .

झिका वायरस , आर्थिक समस्या आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर मात करून रिओ ऑलिंपिकसाठी पूर्ण सज्ज झाल्याचा प्रत्यय येतो तो केवळ माराकाना स्टेडियम आणि " बरा ' मधील खेळाडूंच्या निवासस्थानांच्या परिसरातच. जगातील सर्वोत्तम कुंभमेळ्यासाठी फुटबॉलपंढरी असलेले माराकाना स्टेडियम सजले आहे . उद्घाटन सोहळ्याची लगबग माराकानाच्या परिसरात लक्ष वेधून घेते . रविवारी नेत्रदीपक उद्घाटनाची रंगीत तालीम पार पडली . फुटबॉलसाठी लांबच लांब रांगेत उभी राहणारी पोर्तुगीज मंडळी ऑलिंपिकसाठीही उत्सुक दिसून आली .
ब्राझीलमधील पोर्तुगीज संस्कृतीचा इतिहास उद्घाटन सोहळ्याचा केंदबिंदू असेल. बोटीतून आलेल्या पोर्तुगीज लोकांनी या देशाचा कसा विकास केला यावर सांस्कृतिक कार्यक्रमांनी उद्घाटनाचा बिगुल वाजणार आहे . संचलनानंतर ब्राझीलच्या नृत्य संस्कृतीची झलक जगाला वेड लावेल , असा आयोजकांना अंदाज आहे . आधुनिकतेची जोड देत आपली देशभक्ती दाखविण्याचा प्रयास उद्घाटन सोहळ्यातून प्रकट होईल .

उद्घाटनाची रंगीत तालीम सुरू असताना साऱ्या माराकाना स्टेडियमला छावणीचे स्वरूप आले होते . पोलिसांपेक्षा सेनादलाने स्टेडियम परिसराचा ताबा घेतला आहे . रिओत 70 हजार सैनिक ऑलिंपिकसाठी तैनात होत आहेत. दोन वर्षापूर्वी झालेल्या विश्वकरंडक फुटबॉलच्या स्पर्धेपेक्षा दुप्पट सुरक्षा व्यवस्था ऑलिंपिकसाठी करण्यात आली आहे .

माराकानानंतर बरा ऑलिंपिक पार्कमध्ये चैतन्याचा अनुभव येत आहे . जगभरातील खेळाडूंचे विशेष स्वागत पर्यावरणाचा संदेश देत केले जात आहे . भारतीय पथकातील 70 टक्के खेळाडू रिओत दाखल झाले आहेत. या क्रीडापटूंना भाषा आणि जेवणाच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे . विशेषतः क्रीडाग्रामात असणाऱ्या स्वयंसेवकांना इंग्रजी भाषा येत नसल्याने भारतीय खेळाडूंना संवाद साधता येत नाही . त्यात भारतीय पदार्थ नसल्याने आपले खेळाडू नाराज आहेत. भारतीय पदाधिकारी खेळाडूंच्या समस्या सोडविण्यासाठी धावपळ करीत असले, तरी त्यांना थंड प्रतिसाद मिळत आहे . खेळाडू वातावरणाशी जुळवून घेत असून क्रीडाग्रामातील जलतरण तलावात रोज डुबकी मारत असलेल्या आपल्या हॉकीपटूंना आता सरावाचे वेध लागले आहेत.

फुटबॉलवेडे पोर्तुगीज ऑलिंपिकबाबत उदासीन असल्याचे शहरात फिरताना जाणवते . निम्म्यापेक्षा अधिक तिकीट विक्री अजून बाकी असून फुटबॉलशिवाय इतर खेळांकडे स्थानिक नागरिकांनी पाठ फिरविली आहे . असेच चित्र कायम राहिले तर ब्राझीलियन नागरिकांपेक्षा जगभरातील ऑलिंपिकप्रेमी, पर्यटक ऑलिंपिकचा आनंद लुटताना दिसतील .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹वेगवान 'टॅल्गो' ट्रेन मुंबईत दाखल

मुंबई ते दिल्ली प्रवास अंतर कमी व्हावे आणि उत्तम सुविधा प्रवाशांना मिळावी यासाठी ‘टॅल्गो’सारखी वेगवान ट्रेन रेल्वे मंत्रालयाने चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन शहरादरम्यान टॅल्गो ट्रेनची पहिली चाचणी मंगळवारी यशस्वीरित्या पार पडली. पावसाळ्यातील अनेक अडथळे पार करत ही ट्रेन मंगळवारी सकाळी ११.३५ च्या सुमारास मुंबई सेन्ट्रल येथे दाखल झाली. या ट्रेनच्या मुंबई ते दिल्ली दरम्यान आणखी तीन चाचण्या केल्या जाणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे चाचणीसाठी ३२ वर्ष जुनी असलेली टॅल्गो ट्रॅन वापरण्यात आली.

सोमवारी रात्री आठच्या सुमारास दिल्ली येथून नऊ डबा ‘टॅल्गो’ट्रेन मुंबईसाठी रवाना झाली. ही ट्रेन सकाळी दहाच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेन्ट्रल स्थानकात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र गुजरातमध्ये पडणाºया मुसळधार पावसाचा या ट्रेनला फटका बसला आणि ही ट्रेन मुंबईत दीड तास उशिराने पोहोचली. दिल्ली ते सुरतपर्यंत पोहोचण्यास पावसाचा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे ट्रेनचा वेग कमी ठेवण्यात आल्याने ती मुंबईत पोहोचण्यास उशिर झाल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. दिल्ली ते मुंबई अशी पहिली चाचणी ही इलेक्ट्रीकल इंजिन लावून ताशी् १३0 च्या वेगाने घेण्यात आली आणि ही चाचणी यशस्वी झाली. महत्वाची बाब म्हणजे सुपरफास्ट राजधानीपेक्षा तीन तास उशिराने निघूनही टॅल्गो ट्रेन मुंबईत वेळेवर दाखल झाली. दिल्ली ते मुंबई असा प्रवास करताना या ट्रेनला अनेक स्थानकांवर थांबाही देण्यात आला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹तिरंग्याची कल्पना मांडणा-या पिंगाली वेंकय्यांना जन्मदिनानिमित्त आदरांजली

भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना मांडणारे पिंगाली वेंकय्या यांचा आज ( २ ऑगस्ट) जन्मदिन.

पिंगाली वेंकय्या यांचे नाव फारसे कुणाला माहीत नाही. मात्र त्यांनीच भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना मांडली. ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यात किती आणि कोणते रंग असावेत, त्याचा आकार कसा असावा याचा सखोल अभ्यास करून त्यांनी तिरंगा साकारला. ते केवळ तिरंग्याचे निर्माते नव्हते तर जपानी भाषेचे शिक्षक, सिद्धहस्त लेखक आणि जिओफिजिसिस्टही होते.

कृष्णा जिल्ह्यातील दिवी तालुक्यातील भटलापेन्नुमारू येथील हनुमंतरायुडू आणि वेंकटरत्नम्मा या दांपत्याच्या पोटी २ ऑगस्ट १९७६ रोजी पिंगाली यांचा जन्म झाला. देशभक्तीने भारावलेल्या पिंगाली यांनी वयाच्या १९ व्या वर्षी बोअर युद्धासाठी आपले नाव नोंदवले आणि ते सैन्यात भरती झाले. त्यानंतर आफ्रिकेत असताना त्यांची महात्मा गांधीजींशी भेट झाली आणि त्यांचे ऋणानुबंध जुळले. ते पुढे ५० वर्षे टिकून होते. भारतात परतल्यावर बंगलोर आणि मद्रास येथे त्यांनी रेल्वे गार्ड म्हणून काम केले आणि मग बेल्लारी येथील शासकीय सेवेत प्लेग अधिकारी म्हणून ते रुजू झाले. पण त्यांची देशभक्तीची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षणाच्या ओढीने त्यांनी थेट लोहरमधील अँग्लोवेदिक महाविद्यालय गाठले आणि प्राध्यापक गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जपानी भाषा आणि इतिहासाचे शिक्षण घेतले.

पिंगाली यांनी स्वत:ला नॅशनल स्कूलच्या विकासासाठी वाहून घेतले. या ठिकाणी प्राथमिक सैन्यप्रशिक्षण, घोडेस्वारी, इतिहास आणि शेतीविषयी प्रशिक्षण देण्यात येत असे. ते केवळ पुस्तकी ज्ञानाने समाधानी होणारे नव्हते. त्यांच्या दैनंदिन आचरणातून त्यांचा उदारमतवादीपणा दिसत असे. १९१४ मध्ये आपल्या शेतावर ‘स्वेच्छापुरम’ ही संस्था स्थापन केली.

१९१६-१९२१ या कालावधीत पिंगाली यांनी सुमारे ३० ध्वजांचा अभ्यास करून पिंगाली यांनी भारतीय ध्वजाची कल्पना मांडली. आपल्या तिरंग्याच्या सध्याच्या रूपाचे डिझाईन तयार करण्याचे श्रेय पिंगाली यांना दिले जात असले तरी भारतीय ध्वजाची पाळेपुळे ‘वंदे मातरम्’ चळवळीपर्यंत जातात. १ ऑगस्ट १९०६ रोजी कलकत्त्यातील पारसी बगान स्क्वेअर (ग्रीन पार्क) येथे पहिले ध्वजारोहण झाले. हा ध्वजही तीन रंगांत होता. वरील भागात लाल, मध्ये पिवळा आणि खालच्या बाजूला हिरवा, अशी या झेंडय़ाची रंगसंगती होती. लाल भागात पांढऱ्या रंगाची आठ कमळाची फुले कोरलेली होती. पिवळ्या भागात निळ्या रंगाने देवनागरी लिपीत ‘बंदे मातरम्’ असे लिहिले होते. मदाम कामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९०७ मध्ये पॅरिसमध्ये ध्वजारोहण केले होते. या झेंडय़ाची रंगसंगतीही पहिल्या ध्वजाप्रमाणेच होती. फरक एवढाच की, पहिल्या पट्टीमध्ये केवळ एकच कमळ होते आणि सप्तर्षी दर्शविणारे सात तारे होते. बर्लिनच्या समाजवादी बैठकीत हा ध्वज फडकविण्यात आला. १९१७ मध्ये जेव्हा राजकीय चळवळीने वेग घेतला, त्यावेळी अॅनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ध्वजारोहण केले होते. या ध्वजाच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात युनियन जॅकचा शिक्का होता. त्याचप्रमाणे पांढऱ्या आकाराचे अर्धवर्तुळ आणि ताऱ्याचे चिन्ह होते. त्यावेळच्या जनतेचे उद्दिष्ट दाखविणे हा त्यामागचा संकेत होता आणि सत्ता मिळविण्याची इच्छा प्रदर्शित करण्यासाठी युनियन जॅकचा शिक्का होता. पण त्या ध्वजावरील युनियन जॅकचे अस्तित्त्व ही राजकीय तडजोड असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या ध्वजाचा स्वीकार करण्यात आला नाही. १९२१ मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींकडे आले आणि त्याचवेळी तिरंग्याचे पहिले रूप जनतेसमोर आले.

१९२१ ते १९३१ ही दहा वर्षे पिंगाली यांच्यादृष्टीनेच नव्हे तर आंध्र प्रदेशमधील स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचा कालावधी ठरला. ३१ मार्च आणि १ एप्रिल १९२१ या दोन दिवशी बेझवाडा येथे एआयसीसीच्या (ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने) ऐतिहासिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी पिंगाली वेंकय्या ध्वज घेऊन गांधीजींकडे गेले. भारतातील दोन प्रमुख धर्म दर्शविणारे लाल आणि हिरवा असे दोन रंग यात होते. अशाप्रकारे राष्ट्रध्वज अस्तित्वात आला, पण ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने तो अधिकृतपणे स्वीकारला नव्हता. गांधीजींनी तो स्वीकारल्यानंतर पुढील प्रत्येक कॉँग्रेस बैठकीमध्ये हा ध्वज फडकविण्यात येत असे. सामान्य माणसाच्या प्रगतीचे प्रतीक असलेल्या चरख्याचा या ध्वजामध्ये अंतर्भाव करण्यात यावा, अशी सूचना जालंधरचे हंसराज यांनी केली. त्यानंतर गांधीजींनी इतर अल्पसंख्यांकांचे अस्तित्व दर्शविणारी पांढरी पट्टी या ध्वजात समाविष्ट केली. १९३१ पर्यंत त्याल लोकमान्यता मिळाली नव्हती. ध्वजामधील रंगांचा अर्थ समजण्यावरूनही त्यावेळी जातीय तणाव निर्माण झाला होता. १९३१ मध्ये कराची येथे भरलेल्या कॉँग्रेसमध्ये यावरील अंत

िम तोडगा काढण्यात आला. शौर्य दर्शविणारा भगवा, सत्य आणि शांती दर्शविणारा पांढरा आणि समृद्धी व विश्वास दर्शविणारा हिरवा असा या तीन रंगी ध्वजाचा अर्थ लावण्यात आला. चरखा आणि सूत यांच्याऐवजी ध्वजाच्या मध्यभागी अशोकचक्राचा समावेश करण्यात आला.

राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा अर्थ समजावताना सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितले की, राजकीय नेत्यांनी व्यावहारीक सुखांचा त्याग करणे हे भगवा रंग दर्शवतो, सत्याची वाट दाखवणे हे पांढरा रंग सांगतो तर हिरवा रंग आपले जमिनीशी असलेले नाते दर्शवितो आणि अशोकचक्र हे धर्माचे प्रतीक आहे.

राष्ट्रध्वजाची प्राथमिक कल्पना मांडणारे पिंगाली वेंकय्या यांचे ४ जुलै १९६३ रोजी निधन झाले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘संजीवनी’ शोधण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी शोधमोहीम

मरणासन्न अशा मूर्च्छितावस्थेत असलेल्या व्यक्तीलाही मृत्यूच्या दाढेतून परत आणण्याचे चमत्कारी गुणधर्म असल्याची आख्यायिका असलेली ‘संजीवनी बुटी’चा शोध घेण्यासाठी उत्तराखंड सरकार ऑगस्टपासून एक महत्त्वाकांक्षी शोधमोहीम हाती घेणार आहे.
उत्तराखंडचे ‘आयुष’मंत्री सुरेंद्र सिंग नेगी यांनी सांगितले की, सरकारने या शोधमोहिमेसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
तसेच त्याशिवाय आयुर्वेदिक वैद्यांसह अन्य तज्ज्ञांची एक समितीही त्यासाठी स्थापन केली आहे.

♻ऑगस्टपासून चीनच्या सीमेलगत असलेल्या चमोली जिल्ह्यातील हिमालयाच्या द्रोणागिरी पर्वतरांगांमध्ये ‘संजीवनी’ चा शोध सुरू केला जाणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मुंबई विमानतळाला उत्कृष्ट पर्यटन सेवेचा पुरस्कार:

पर्यटन प्रोत्साहनासाठी 2014-15 चा उत्कृष्ट सेवेचा पुरस्कार छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळाला आहे.

पर्यटन मंत्रालयातर्फे विज्ञान भवनात झालेल्या शानदार सोहळ्यात लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले.

पर्यटन व सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा या वेळी उपस्थित होते.
 छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कॉर्पोरेट व्यवहार खात्याचे महाव्यवस्थापक राहुल बॅनर्जी आणि एरो मार्केटिंगचे उपाध्यक्ष रवीन पिंटो यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

देशातील 29 शहरांना मुंबईशी जोडणाऱ्या या विमानतळावरून दररोज 190 विमाने उड्डाण करतात, तर 85 आंतरराष्ट्रीय शहरांमध्येही या विमानतळावरून विमाने पोचतात.
 काश्‍मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक नेणाऱ्या 'केसरी टुर्स'चादेखील कार्यक्रमामध्ये गौरव करण्यात आला.

💐 💐 रिओ ऑलिंपिक स्पर्धेला सुरुवात 💐 💐

जगभरातील क्रीडाशौकिनांचे लक्ष लागून राहिलेल्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेला आज (दि.5) पासून सुरवात होत आहे.
दक्षिण अमेरिकेतील एखाद्या देशात होणारी ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा आहे.

निळाशार समुद्र आणि लुसलुशीत वाळूने अथांग पसरलेले बीच ही खऱ्या अर्थाने रिओची ओळख असली, तरी या स्पर्धेच्या निमित्ताने जागतिक क्रीडा नकाशावर रिओचे नाव ठळकपणे उमटणार आहे.
जगभरातील खेळाडू आपले कौशल्य दाखवण्यासाठी येथे एकत्र आले असले, तरी त्यांच्या सहभागाने खऱ्या अर्थाने मैत्री आणि विश्वबंधुत्त्वाचा संदेशच दिला जाणार आहे.

मात्र, 'झिका' विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने अनेक दिग्गज खेळाडूंनी घेतलेली माघार आणि स्पर्धेच्या ऐन तोंडावर उघडकीस आलेले रशियातील सर्वात मोठे 'डोपिंग' प्रकरण या सगळ्याचा परिणाम स्पर्धेवर निश्चित होईल.
तसेच प्रसिद्ध मराकाना मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे.

ऑलिंपिक नगरीत -
206 सहभागी देश
1 संघ निर्वासितांचा
11,239 सहभागी खेळाडू
28 खेळ
308 क्रीडा प्रकार

आयओसीच्या सदस्यपदी नीता अंबानी :
रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांची रिओ ऑलिम्पिकच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) आठ नव्या सदस्यांमध्ये निवड झाली.
आयओसीशी जुळलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.

नीता अंबानी भारतातून आयओसीच्या एकमेव सदस्य आहेत. त्या 70 वर्षांच्या होईस्तोवर आयओसीत कायम राहतील.
तसेच येथे पार पडलेल्या आयओसीच्या 129 व्या सत्रात आयओसीच्या सदस्यपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
आठ नव्या सदस्यांसह आयओसीची सदस्य संख्या 98 इतकी झाली.
भारतीय उपखंड अंटार्क्टिकाचा भाग होता .

👍🏻 रियोसाठी रशियाच्या 78 खेळाडूंना ‘ग्रीन सिग्नल’ :
सरकार पुरस्कृत डोपिंगचा आरोप असलेल्या रशियन खेळाडूंसाठी (दि.4) संध्याकाळ अत्यानंदाची ठरली.
स्पर्धा सुरू होण्यास 24 तासांपेक्षाही कमी अवधी शिल्लक असताना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने रशियाच्या 78 खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संमती दिल्याचे जाहीर केले.
तसेच यात 29 जलतरणपटू, 18 नेमबाज प्रत्येकी 11 मुष्टियोद्धे व ज्युदो खेळाडू, 8 टेनिसपटू व एका गोल्फ खेळाडूचा समावेश आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विजय रुपानी होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री

विजय रुपानी यांच्याच गळ्यात गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पडेल , तर या स्पर्धेत आघाडीवर असणारे नितीन पटेल हे उपमुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे .

दोन्ही प्रमुख पदांचा शपथविधी रविवारी 7 ऑगस्ट रोजी होणार आहे . राज्याच्या प्रमुखपदासाठी पक्षाच्या आमदारांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला . या बैठकीला भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि नितीन गडकरी निरीक्षक म्हणून उपस्थित होते .

रुपानी हे गुजरात भाजपचे अध्यक्ष असून , ते आनंदीबेन यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात वाहतूक , पाणीपुरवठा, कामगार व रोजगार मंत्री होते . रुपानी हे 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. नंतर ते कर्नाटकचे राज्यपाल झाले . आनंदीबेन यांच्या जागी सर्वांत निर्विवाद उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते . पक्षात त्यांचे वजन असल्याने मुख्यमंत्रिपदावर त्यांची वर्णी लागली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राज्यात "चिरंजीव ' योजना

राज्यातील ज्या भागात मातामृत्यू दर आणि अर्भक मृत्युदर जास्त आहे अशा भागात गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना हा पायलट प्रकल्प राबविला जाणार आहे . तसेच जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या उपलब्धतेनुसार वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री डॉ . दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली . आमदार नीलम गोऱ्हे , हुस्नबानो खलिफे, माणिकराव ठाकरे , भाई गिरकर , तसेच इतर सदस्यांनी राज्यातील रुग्णालयाबाबत प्रस्ताव मांडला . त्या वेळी सावंत बोलत होते . राज्यातील रुग्णालयांमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा पुरविण्यासाठी डॉक्टरांबरोबर विशेषज्ञ डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील असून , प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय असणार आहे . त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णांना फायदा होईल . त्याचबरोबर डॉक्टरांचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे वाढविण्याचे केंद्राकडे प्रस्तावित असल्याचेही सावंत यांनी सांगितले . तसेच रुग्णालयामधून बालकांची होणारी चोरी टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयांत सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून दिले जात आहेत.

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात योजनांची अंमलबजावणी:
राज्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांतही सर्व योजनांचा लाभ देण्यात येत आहे . त्याचबरोबर विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कॉल सेंटर सुविधा, विविध प्रकारचे सॉफ्टवेअर उपलब्ध करण्यात आले आहे . रुग्णांच्या नातेवाइकांची सोय होण्यासाठी रुग्णालयांशेजारी धर्मशाळा बांधण्याचा विचार आहे . त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये मोफत अन्न पुरविण्यासाठी सिद्धिविनायक आणि दगडूशेठ हलवाई या मंदिर विश्वस्तांशी संपर्क साधल्याची माहिती त्यांनी दिली . विविध प्रकारचे कर्करोग टाळण्यासाठी त्यावर तज्ज्ञांमार्फत उपचार करण्यासाठी टाटा संस्थेची मदत घेणार आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दहा लाख नागरिकांमागे केवळ 18 न्यायाधीश

भारतातील स्थिती ; कायदा मंत्रालयाचा अहवाल:

 कायदा आयोगाने 1987 मधील आपल्या अहवालात प्रत्येक दहा लाख नागरिकांमागे 50 न्यायाधीश हवे असल्याची शिफारस केली होती . तुलनेत आजच्या घडीला ही संख्या केवळ 18 असल्याचे समोर आले आहे . भारताच्या सरन्यायाधीशांनीही अलीकडेच न्यायाधीशांची संख्या वाढविण्यावर जोर दिला होता .

कायदा मंत्रालयाने सार्वजनिक केलेल्या माहितीनुसार , भारतातील लोकसंख्येच्या तुलनेत न्यायाधीशांचे प्रमाण प्रत्येक दहा लाख नागरिकांमागे 17 .86 न्यायाधीश असे आहे . मिझोराममध्ये न्यायाधीशांचे हेच प्रमाण सर्वाधिक 57 .74 असे आहे . दिल्लीमध्ये हे प्रमाण 47 .33 , तर सर्वाधिक लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशमध्ये दहा लाख नागरिकांमागे हेच प्रमाण 10 .54 असे आहे . लोकसंख्या आणि न्यायाधीशांच्या प्रमाणामध्ये पश्चिम बंगाल सर्वांत तळाच्या स्थानावर असून , या राज्यात हे प्रमाणे प्रत्येक दहा लाख नागरिकांमागे 10 .45 न्यायाधीश असे आहे .

सर्वोच्च न्यायालयातही कमतरता:
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या आजच्या घडीला 31 अशी आहे . यामध्ये सरन्यायाधीशांचाही समावेश आहे . 2009 मध्ये हीच संख्या 25 वर होती . तरीही सर्वोच्च न्यायालयाला आणखी 3 न्यायाधीशांची उणीव भासत आहे . चार नवीन न्यायाधीशांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे . उच्च न्यायालयाला मंजूर केलेल्या न्यायाधीशांची संख्या 2014 पर्यंत 906 अशी होती आणि आता ती या वर्षी जूनमध्ये 1079 वर पोचली आहे . देशात 24 उच्च न्यायालये आहेत. उच्च न्यायालयालाही सुमारे 477 न्यायाधीशांची उणीव भासत आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय उपखंड होता अंटार्क्टिकाचा भाग

संशोधकांचा दावा; मानवी उत्क्रांतीआधी मोठी उलथापालथ

मानवी उत्क्रांतीच्याही आधी भारतीय उपखंड हा अंटार्क्टिकाचा भाग होता , त्यानंतर भूपृष्ठाच्या हालचालींमुळे तो अनेकदा या खंडापासून कधी दूर गेला , तर कधी जवळही आला , असा दावा भूगर्भसंशोधकांनी पुराव्यानिशी केला आहे . भारतीय आणि स्विस भूगर्भ संशोधकांचे एक पथक पृथ्वीच्या भूपृष्ठांची नेमकी कशा पद्धतीने उत्क्रांती होत गेली , यावर संशोधन करत असून , यासाठी काही दुर्मिळ खडकांच्या नमुन्यांचाही अभ्यास करण्यात आला होता . यातून खंडांच्या निर्मितीबाबत माहिती देणारे महत्त्वपूर्ण पुरावे संशोधकांच्या हाती लागले आहेत.

या संशोधनाबाबत माहिती देताना आयआयटी खड्गपूरमधील भूगर्भ संशोधक देवाशिष उपाध्याय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की , ' प्रथमच अंटार्क्टिका खंड आणि भारतीय उपखंड एकच असल्याचे पुरावे आम्हाला प्राप्त झाले असून , दीड अब्ज वर्षांपूर्वी ते परस्परांपासून दूर झाले , या दोन्ही खंडांदरम्यान आता विस्तीर्ण महासागर आहे . '' एकदा परस्परांपासून दूर झाल्यानंतर या दोन्ही खंडांची पुन्हा आपापसांत धडक झाली . या धडकेतूनच एक अब्ज वर्षांपूर्वी पूर्व पर्वत रांगांची साखळी निर्माण झाली , असेही त्यांनी नमूद केले. " एल्सव्हियर' या नियतकालिकात हे संशोधन विस्ताराने प्रसिद्ध करण्यात आले आहे .

पुन्हा धडक
सहाशे दशलक्ष वर्षांपूर्वी दोन्ही खंडांमध्ये पुन्हा धडक झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे . या धडकेतून पवर्तरांग तयार झाली होती . भारत , श्रीलंका आणि मादागास्कारपर्यंत तिचा विस्तार होता . ही पर्वतराजी कधीकाळी भारतीय उपखंडाचाच एक भाग होती असे स्वित्झर्लंडमधील बर्न विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रो . क्लास मेझगर यांनी सांगितले .

मानवी उत्क्रांतीपूर्वी
या मोठ्या भूगर्भीय हालचाली या प्रामुख्याने मानवी उत्क्रांतीच्या आधी झाल्या . सिंहभूम , झारखंड , ओडिशातील पूर्व घाट येथील खडकांच्या नमुन्यांचा यासाठी अभ्यास करण्यात आला होता . या अभ्यासातून आमच्या हाती आलेल्या पुराव्यांनुसार खंडाच्या निर्मितीबाबत ठोस असे निष्कर्ष काढता येतात , असे उपाध्याय यांनी नमूद केले.

टेक्टॉनिक प्रक्रिया
टेक्टॉनिक प्लेट्सच्या प्रक्रियांमुळे खंडांची हालचाल होते. यामुळे पर्वतरांगांची निर्मिती , ज्वालामुखी आणि भूकंप आदींचा सविस्तर अभ्यास करता येतो . पृथ्वीच्या पृष्ठभागाची उत्क्रांतीदेखील या माध्यमातून समजून घेता येऊ शकते , असेही संशोधकांचे म्हणणे आहे . टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे दोन मोठ्या खंडांत धडक होते. तसेच ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे एकंदरितच हवामानाचे चक्रदेखील बिघडते , असेही यातून दिसून आले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शेगावचा युग करणार उदया पंतप्रधानांसोबत चर्चा

मोदी सरकारच्या गुड गवर्नेंस या उपक्रमाला आणखी प्रभावीपणे राबविण्याकामी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी दिल्ली येथे देशभरातून आमंत्रित केलेल्या ११ हुशार विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. या चर्चेत अग्रक्रमावर शेगावचा युग भूतड़ा हां विद्यार्थी राहणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विषयावर दर दोन महिन्यात देशातील हुशार विद्यार्थ्यांना आमंत्रित करुण त्यांच्या कडून चर्चेच्या माध्यमाने सुझाव घेतले. याच धर्तीवर भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनीही देशभरातील काही हुशार विद्यार्थ्यांना आमंत्रीत केले आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता दिल्ली येथील टाऊन हॉलमध्ये एका आॅनलाइन परीक्षेद्वारे निवडलेल्या ११ विद्यार्थ्यांशी ते गुड गवर्नेंस या विषयवार चर्चा करणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाकडून या परीक्षेसाठी ३०० सेकंदाचा वेळ देण्यात आला होता. शेगावच्या युग राजेश भुतडा या विद्यार्थ्याने केवळ २२७ सेकंदात सर्व प्रश्न सोडविले. विशेष म्हणजे या परीक्षेत त्याने प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. युग हा सध्या अकोला येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नीता अंबानी आयओसीच्या सदस्यपदी

रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांची रिओ आॅलिम्पिकच्या पूर्वसंध्येला गुरुवारी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या (आयओसी) आठ नव्या सदस्यांमध्ये निवड झाली.

आयओसीशी जुळलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. नीता अंबानी भारतातून आयओसीच्या एकमेव सदस्य आहेत. त्या ७० वर्षांच्या होईस्तोवर आयओसीत कायम राहतील. यंदा जून महिन्यात आयओसीच्या कार्यकारी बोर्डाने नीता अंबानी यांचे नाव सुचविले होते. आज येथे पार पडलेल्या आयओसीच्या १२९ व्या सत्रात आयओसीच्या सदस्यपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आठ नव्या सदस्यांसह आयओसीची सदस्य संख्या ९८ इतकी झाली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹फेसबुकची नवी ' सोलर हार्डवेअर लॅब

 कल्पक , अभिनव आणि सर्जनशील प्रयोगांना नेहमीच प्राधान्यक्रम देणाऱ्या "फेसबुक' या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईटने संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी नवी "हार्डवेअर लॅब ' उभी केली आहे . याबाबत फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे .

या लॅबची वैशिष्ट्ये -
या नव्या प्रयोगशाळेचा आकार फुटबॉल मैदानाच्या निम्मा आहे .

या लॅबमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या वेगापेक्षा वेगाने युजर्सशी कनेक्ट होण्यास मदत होणार आहे .

या प्रयोगशाळेत अभियंत्यांना अवश्य असलेली सर्व साधने उपलब्ध असून सीटी स्कॅनर , इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यांचाही समावेश आहे .

या लॅबच्या निर्मिती करण्यासाठी तब्बल दहा वर्षांचा कालावधी लागला.
या लॅबची निर्मिती करण्यासाठी फेसबुकच्या मुख्यालयातील एक मजला काढून टाकावा लागला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नेपाळच्या पंतप्रधानपदी प्रचंड यांचा शपथविधी

कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ ( सीपीएन) चे अध्यक्ष आणि माओवादी नेते पुष्पकमल दहल ऊर्फ प्रचंड यांनी आज नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली . काल त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली होती . प्रचंड हे देशाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत.

अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी प्रचंड यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली . प्रचंड यांनी सहा सदस्यीय मंत्रिमंडळ स्थापन केले असून त्यामध्ये दोन उपपंतप्रधान आहेत.
 माओवादी नेते कृष्णबहादूर माहरा हे उपपंतप्रधान असून त्यांच्याकडे अर्थखाते सोपविण्यात आले आहे . नेपाळी कॉंग्रेसचे नेते विमलेंद्र निधी हे दुसरे उपपंतप्रधान असून त्यांच्याकडे गृहखाते देण्यात आले आहे . अन्य मंत्र्यांमध्ये रमेश लेखक, दलजित श्रीपाली , गौरीशंकर चौधरी यांचा समावेश आहे . या सर्वांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹टोकियो ऑलिंपिकमध्ये पाच नवे खेळ

रिओ - रिओ ऑलिंपिक स्पर्धेचे बिगुल वाजत असतानाच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने ( आयओसी ) टोक्यो 2020 ऑलिंपिक स्पर्धेसाठी पाच नव्या खेळांच्या समावेशास मान्यता दिली . " आयओसी ' च्या बुधवारी झालेल्या 129 व्या सभेत हा निर्णय घेण्यात आला .

नव्याने समावेश करण्यात आलेल्या खेळांमध्ये बेसबॉल / सॉफ्टबॉल , कराटे , स्केटबोर्ड, स्पोर्टस क्लायबिंग आणि सरफिंग यांचा समावेश आहे . यातील बेसबॉल/ सॉफ्टबॉल आणि कराटे हे मैदानी खेळ वगळता अन्य तीन खेळ हे साहसी क्रीडा प्रकारांत मोडले जातात. या तीनही खेळांसाठी संयोजकांना तात्पुरती मैदाने उभी करावी लागणार आहेत. युवा पिढीला खेळाकडे आकर्षित करण्यासाठी या खेळांचा समावेश करण्यात आला आहे .

पुढील ऑलिंपिकपासून स्पर्धेच्या क्रीडा प्रकारांमध्ये लवचिकता यावी यासाठी " आयओसी ' कडे काही खेळांचे प्रस्ताव आले होते . यामधून या पाच खेळांची निवड करण्यात आली . यासाटी गेल्या ऑलिंपिकपासून रचनेला सुरवात झाली होती . सप्टेंबर 2015 मध्ये टोक्यो संयोजन समितीने या पाच खेळांचा प्रस्ताव " आयओसी ' कडे पाठवला होता .
" आयओसी ' चे अध्यक्ष थॉमस बाख म्हणाले , "" आम्हाला खेळ युवकांपर्यंत घेऊन जायचे आहेत. ते आमच्यापर्यंत येणार नाहीत , तर आपल्याला त्यांच्यापर्यंत जायला हवे . याच हेतूने आम्ही युवकांना आकर्षित करणाऱ्या या खेळांची निवड केली .''

टोक्यो ऑलिंपिकमध्ये देखील 28 खेळांचाच समावेश करण्याचा निर्णय झाला आहे . या पाच नव्या खेळांच्या समावेशामुळे कोणत्या पाच खेळांना वगळायचे यावर आयओसीच्या 2017 च्या मध्यात होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय होईल .

या खेळांच्या समावेशामुळे
- 18 क्रीडा प्रकार वाढणार
- 474 खेळाडूंची भर
- बेसबॉल किंवा सॉफ्टबॉलच्या समावेशावर अन्य खेळाडूंची संख्या ठरणार. सॉफ्टबॉलचा समावेश झाल्यास या खेळात एका संघात 15 , तर बेसबॉलचा समावेश झाल्यास या खेळात एका संघात 24 खेळांचा समावेश असतो.
काय आहेत हे खेळ

स्केटबोर्ड :
यात एका बोर्डला स्केटिंगची व्हिल जोडली जातात आणि त्यावरून विविध लहान मोठे , छोटे , उंच अडथळे पार करायचे

सरफिंग :
पाण्याच्या पृष्ठभागावर खेळला जाणारा हा खेळ. पाण्यात उसळणार लाटांवर आरूढ होत मार्ग आखाण्याचे खरे आव्हान असते .

स्पोर्ट क्लायबिंग :
 हा रॉक क्लायबिंगचा एक भाग. अर्थात , यासाठी डोंगरावर वगैरे जावे लागत नाही . मैदानात ठराविक उंचीची भिंत उभी केली जाते आणि त्यावर चढून जायचे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विधान परिषदेच्या उपसभापतीपदी माणिकराव ठाकरे यांची बिनविरोध निवड

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शुक्रवारी काँग्रेसचे आमदार माणिकराव ठाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपच्या भाई गिरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
एकूण ७८ सदस्यीय विधान परिषदेत राष्ट्रवादीचे २७ तर काँग्रेसचे १९ सदस्य आहेत. दोन्ही पक्ष एकत्र राहिल्यास काँग्रेसचे मणिकराव ठाकरे यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण भाजपचे भाई गिरकर यांनी गुरुवारी अर्ज भरल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या वर्षी तत्कालीन सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरुद्ध अविश्वाचा ठराव मंजूर करण्याकरिता राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले होते. तेव्हा उपसभापतीपद देण्याचे राष्ट्रवादीने मान्य केल्याचा दावा भाजपकडून केला जातो. भाजपच्या या दाव्यामुळे काँग्रेसच्या गोटात गोंधळाचे वातावरण पसरले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन जागांवर पाठिंबा देण्याच्या बदल्यात काँग्रेसला उपसभापतीपद देण्याचे राष्ट्रवादीने मान्य केले असल्याकडे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लक्ष वेधले. या सर्व पार्श्वभूमीवर अखेर शुक्रवारी भाई गिरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने माणिकराव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली.

तब्बल सहा वर्षे प्रदेशाध्यक्षपद: भूषविलेल्या माणिकराव ठाकरे यांना पक्षाने उपसभापतीपदाकरिता संधी दिली. काँग्रेसमध्ये गटनेते शरद रणपिसे हे सुद्धा स्पर्धेत होते. पण पक्षाने विदर्भातील नेत्याकडे हे पद सोपविले आहे. १९९९ ते २००३ या काळात ठाकरे यांनी राज्यमंत्रिपद भूषविले होते. त्यानंतर तब्बल १३ वर्षांने त्यांना लाल दिव्याची गाडी मिळणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सांगलीतील आयर्विन पूल अवजड वाहतुकीसाठी बंद

महाडच्या पूल दुर्घटनेनंतर जाग आलेल्या प्रशासनाकडून सांगलीजवळील ८६ वर्षे वयोमानाचा आयर्विन पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. या पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्याचे दगड निसटले आहेत, तसेच त्यावर झाडेही उगवली आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, वाहतूक नियंत्रण, परिवहन विभागाचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. त्यामध्ये अवजड वाहनांना या पूलावरून वाहतुकीस बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या २४ तासांत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
पुण्याला जाण्यासाठी संस्थानकाळात सांगलीच्या गणेश मंदिराजवळ सांगली संस्थानने कृष्णा नदीवर पुलाची उभारणी केली. या पुलाचे उद्घाटन १८ नोव्हेंबर १९२९ रोजी तत्कालीन गव्हर्नर जनरल लार्ड बॅरन आयर्विन व त्यांच्या पत्नी लेडी आयर्विन यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलासाठी संस्थानने सहा लाख रूपये खर्च केला होता. संस्थानचे अभियंते व्ही. जी. भावे, व्ही. एन. वर्तक आणि मेसर्स व्ही. आर. रानडे अॅण्ड सन्स यांनी या पुलाची उभारणी केली.

सांगली शहरालगत उभारण्यात आलेल्या आयर्विन पुलाची लांबी ८२० फूट आणि रूंदी ३२ फूट आहे. पुलाची उंची ७० फूट असून आर्च पद्धतीने या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. पुलाचे आयुष्य संपल्याने या पुलावरून वाहतूक बंद करण्याबाबत विचार सुरू झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाला पर्याय म्हणून नवीन पुलाची उभारणी बांधा, वापरा व हस्तांतरित करा या योजनेतून केली.

मात्र नवीन पुलावर जाण्यासाठी किमान चार ते पाच किलोमीटर अंतर जादा पडत असल्याने याच पुलावरून वाहतूक सुरू राहिली. या पुलावरून महापालिकेने सांगलीवाडीसाठी पिण्याच्या व ड्रेनेजसाठी सव्वा फूट व्यासाच्या नलिका टाकलेल्या आहेत. याशिवाय संरक्षक लोखंडी बॅरिकेटसही जीर्ण झाले आहेत. पुलाचा पायाही अखंड वाळू उपशामुळे उघड झाला असल्याने पुलाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या दगडी बांधकामामध्ये वड व पिंपळाची झाडे उगविली असल्यामुळे बांधकामाला भेगाही काही ठिकाणी पडल्या असल्याने पुलावरील वाहतूक धोकादायक ठरली आहे. त्यापार्श्वभूमीवर अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भूशास्त्रीय प्रक्रियेमुळे सेरीसवर अपेक्षेपेक्षा कमी विवरे

सेरीस हा बटूग्रह असून त्याला त्याच्या साडेचार अब्ज वर्षांच्या आयुष्य काळात लघुग्रहांचे अनेक हादरे बसले असले, तरी त्याच्यावरील विवरांची संख्या आश्चर्यकारक रीत्या कमी आहे, असे नासाच्या ‘डॉन’ या अवकाशयानाने पाठवलेल्या माहितीतून दिसून आले आहे. सेरीसवर अनेक लहानमोठी विवरे आहेत पण त्यांचा व्यास २८० किलोमीटरपेक्षा अधिक नाही. सेरीसवरील गायब विवरांचे कोडे अजून सुटले नसल्याने त्यांचे संशोधन मार्चमध्ये ‘डॉन’ या सेरीसभोवती फिरणाऱ्या यानाने केले आहे. अमेरिकेतील साउथ वेस्ट रीसर्च इन्स्टिटय़ूटचे मुख्य संशोधक सिमोन मार्ची यांच्या मते सेरीसवर मोठी विवरे होती पण ती भूगर्भशास्त्रीय कारणांमुळे नष्ट झाली आहेत, कारण सेरीस या ग्रहाची उत्क्रांत अवस्था वेगळी होती. संशोधकांनी इतर घटकांचे सेरीसवरील आघात कसे असावेत याचे काही नमुना आघात तयार केले, त्यानुसार त्या ग्रहावर जास्त विवरे असायला हवी होती. त्या नमुन्यानुसार सेरीसवर ४०० कि.मी. व्यासाची १० ते १५ विवरे असावीत व १०० कि.मी. व्यासाची ४० विवरे असावीत पण डॉन अवकाशयानाने जे संशोधन केले आहे त्यानुसार तेथे १०० कि.मी. व्यासाची १६ विवरे आहेत व एकही विवर २८० कि.मी. पेक्षा जास्त व्यासाचे नाही. सेरीसच्या मूळ अवस्थेबाबत माहितीनुसार तो सौरमालेपासून फार दूर व नेपच्यूनच्या पलीकडे आहे. वैज्ञानिकांच्या मते सेरीस स्थलांतरित झाला असला, तरी तो फार उशिरा सौरमालेतील लघुग्रह पट्टय़ात गेला आहे त्यामुळे त्याच्यावर विवरे आहेत पण ती आता दिसत नाहीत.

लोकमत विधिमंडळ पुरस्कार सोहळा :

‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वात्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. असे पुरस्कार देणारे ‘लोकमत’ हे पहिले वृत्तपत्र आहे.
  स्वातंत्र्य दिनाच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
  पुरस्काराचे मानकरी -
  लोकमत रिडर्स चॉईस अवॉर्ड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  जीवनगौरव पुरस्कार (विधानसभा सदस्य) - गणपतराव देशमुख
  जीवनगौरव पुरस्कार (विधान परिषद सदस्य) - शिवाजीराव देशमुख
  उत्कृष्ट नवोदित आमदार (विधानसभा सदस्य) - अतुल भातखळकर
  उत्कृष्ट नवोदित आमदार (विधान परिषद सदस्य) - राहुल नार्वेकर
  उत्कृष्ट महिला आमदार (विधानसभा सदस्य) - वर्षा गायकवाड
  उत्कृष्ट महिला आमदार (विधान परिषद सदस्य) - निलम गो-हे
  उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधानसभा सदस्य) - प्रकाश आबिटकर
  उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधान परिषद सदस्य) - धनंजय मुंडे

सविस्तर चालू घडामोडी @chalughadamodi

अभिनव बिंद्राकडे भारतीय पथकाचे नेतृत्व :

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याने तिरंगा हाती घेऊन अभिमानाने 119 भारतीय खेळाडूंच्या पथकाचे नेतृत्व केले.
  ब्राझीलमधील रिओ दी जानिरो शहरात होत असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार (दि॰5) पार पडला.
  तसेच या ऑलिंपिकमध्ये भारताचे 119 खेळाडूंचे पथक दाखल झाले असून, आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे पथक आहे.
  अभिनव बिंद्रा यंदा पाचव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहे. त्याला यंदा भारतीय पथकाचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला होता.
  उद्घाटन सोहळ्यात भारतीय पुरूष खेळाडू ब्लेझर आणि ट्राऊझरमध्ये दिसून आले, तर महिला खेळाडूंनी साडीला पसंती दिली होती.
  प्रसिद्ध मराकाना मैदानावर स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा रंगला. ब्राझीलच्या संस्कृतीचे दर्शन या सोहळ्यातून घडले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ओबीसी , भटक्या विमुक्तांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा सहा लाख

राज्यातील सरकार मान्यताप्राप्त, खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग , विशेष मागास प्रवर्ग , विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा साडेचार लाखांवरून सहा लाख एवढी वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली .
सन 2016 -17 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल. उच्च व तंत्रशिक्षण विभाग , वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग , कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शासन मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या विविध सामाजिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाची संधी देण्यात येते . या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि मदत म्हणून शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती सामाजिक न्याय विभागामार्फत करण्याची योजना 2006 - 07 या शैक्षणिक वर्षापासून राबविण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला होता . त्यानुसार ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मानवरहित विमानांसाठी देशी बनावटीचे इंजिन

नगरच्या व्हीआरडीईमध्ये संशोधन:

संरक्षण विभागाच्या येथील वाहन संशोधन व विकास संस्थेने (व्हीआरडीई) टेहळणी करणाऱ्या मानवरहित विमानांसाठी संपूर्ण देशी बनावटीचे रोटरी इंजिन विकसित केले आहे. यापूर्वी हे इंजिन आयात केले जात होते. आयात इंजिनाचा खर्च तसेच त्याची देखभाल व दुरुस्ती, सुटय़ा भागांची उपलब्धता याचा विचार करुन संरक्षण विभागाने संपूर्ण देशी बनावटीचे इंजिन तयार करण्याची जबाबदारी व्हीआरडीई संस्थेतील शास्त्रज्ञांवर सोपवली होती.
व्हीआरडीईमध्ये नुकत्याच झालेल्या समारंभात संस्थेचे संचालक तथा मेजर जनरल अजय गुप्ता यांनी हे इंजिन बंगळुरुमधील हवाई वाहतूक विकास संस्थेच्या प्रमुखांकडे (एडीई) सुपूर्द केले. या वेळी गुप्ता यांनी संपूर्ण देशी बनावटीचे इंजिन तयार केल्याबद्दल संस्थेतील शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. बंगळुरुस्थित एडीई संस्थेकडून हे इंजिन टेहळणीसाठी वापरल्या जाणाऱ्या मानव विरहित ‘निशांत’ या विमानासाठी तसेच रत्यांवरुन टेहळणीसाठी धावणाऱ्या ‘पंछी’ या वाहनासाठी वापरले जाणार आहे. हवेतील व रस्त्यावरुन धावणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांसाठी हे रोटरी इंजिन उपयुक्त असल्याचे व्हीआरडीईच्या सूत्रांनी सांगितले. यातील ‘निशांत’ हे मानवरहित विमान विकसित करण्यातही व्हीआरडीईच्या शास्त्रज्ञांचा मोठा वाटा आहे. ‘निशांत’चा वापर संरक्षण विकास व संशोधन संस्थेकडूनही (डीआरडीओ) होत होता. नव्या इंजिनाची चाचणी यशस्वी झाल्याने आता त्याचे व्यापारी उत्पादन सुरु केले जाणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शुभा मुदगल यांची राजीव गांधी सद्भावना पुरस्कारासाठी निवड

हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका शुभा मुदगल यांची राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सामाजिक ऐक्य, शांतता व सदिच्छा यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना मिळणार असलेल्या या पुरस्काराचे स्वरूप रोख १० लाख रुपये व मानपत्र असे आहे. राजीव गांधी सद्भावना पुरस्कार सल्लागार समितीच्या गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत मुदगल यांना या पुरस्कारने सन्मानित करण्याचा निर्णय गेण्यात आला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अपोलो मोहिमेतील चांद्रवीरांवर वैश्विक किरणांचा अनिष्ट परिणाम

अपोलो चांद्र मोहिमेतील सहभागी अवकाशवीरांवर वैश्विक किरणांचा परिणाम झाला असून त्यांच्यात हृदयाचे आजार जास्त प्रमाणात दिसून आले असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रा. मायकेल डेल्प यांनी सांगितले की, जे लोक अवकाशात अगदी खोलवरची मोहीम असलेली चांद्रमोहीम करून परत आले त्यांच्यावर वैश्विक प्रारणांचा परिणाम झाला आहे. पृथ्वी निकटच्या अवकाश मोहिमा करणाऱ्या अवकाशवीरांच्या तुलनेत त्यांच्यावर जास्त परिणाम झाला आहे. वैश्विक किरणांमुळे त्यांच्या प्रकृतीवर जो परिणाम झाला त्यात प्रामुख्याने हृदयरोगाचे प्रमाण जास्त आहे. दूरच्या अवकाश मोहिमांचे मानवी आरोग्यावरील परिणाम आतापर्यंत फारसे माहिती नाहीत. हृदयावर अशा मोहिमांचा काय परिणाम होतो याची माहिती आतापर्यंत नव्हती आता ती काही प्रमाणात हाती आली आहे. मानवावर अवकाश मोहिमांचे होणारे अनिष्ट परिणाम नेमके कुठल्या प्रकारचे असू शकतात याचा अभ्यास अपोलो मोहिमेतील अवकाशवीरांच्या मदतीने करण्यात आला. १९६८ ते १९७२ या काळात अमेरिकेने चंद्रावर ११ समानव अवकाश मोहिमा पाठवल्या. त्यातील नऊ मोहिमा या पृथ्वीच्या कक्षेपलीकडे अवकाशात खूप खोलवरच्या होत्या. अपोलो कार्यक्रम हा माणसाला चंद्रावर उतरवण्यात यश आल्यामुळे विशेष गाजला होता. १९९५ मधील रॉन हॉवर्ड यांच्या चित्रपटाचा विषय ठरलेली अपयशी अपोलो १३ मोहीम वगळता इतर काही मोहिमा यशस्वी झाल्या होत्या. अलीकडच्या काळात मंगळासारख्या चंद्रापेक्षाही खूप दूरच्या ग्रहावर मोहिमा आखण्याचे मनसुबे अमेरिका व इतर देशातील खासगी संस्था आखत असताना खोलवरच्या अवकास मोहिमांचे माणसांवर काय परिणाम होतात यावरचे संशोधन महत्त्वाचे आहे. नासाने २०२० ते २०३० दरम्यान समानव चांद्र मोहिमा पुन्हा करण्याचे ठरवले असून त्या फक्त चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यापुरत्या मर्यादित असणार आहेत. रशिया, चीन व युरोपीय अवकाश संस्था, एलन मस्क यांची स्पेस एक्स यांनी २०२६ पर्यंत माणसाला मंगळावर उतरवण्याचे ठरवले आहे. मंगळावर जाण्यासाठी अवकाश वीरांची निवड करताना त्यांच्या आरोग्यावरील संभाव्य परिणाम महत्त्वाचे आहेत. त्याप्रमाणे त्यांना वैद्यकीय सुविधाही द्याव्या लागणार आहेत. अपोलो मोहिमातील अवकाशवीरांचा अनुभव हा दूरच्या अवकाश मोहिमा करणाऱ्या अवकाशवीरांसाठी महत्त्वाचा आहे. अपोलो मोहिमांनंतर काही वर्षांनी मरण पावलेल्या अवकाशवीरांपैकी ४३ टक्के अवकाशवीर हे हृदयविकाराने मरण पावलेले आहेत. त्यांची संख्या पृथ्वी निकट कक्षेतील अवकाशवीरांच्या हृदयविकाराने मरण पावलेल्या अवकाशवीरांपेक्षा चार ते पाच पट अधिक आहे. अपोलो मोहिमेत २४ जण दूरच्या अवकाश मोहिमेवर जाऊन आले. त्यातील आठ मरण पावले असून उरलेल्या सातजणांचा अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. अपोलो अवकाशवीरांना ज्या वैश्विक प्रारणांना सामोरे जावे लागले तेवढय़ाच प्रतीच्या प्रारणांचा वापर डेल्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी उंदरांवरील प्रयोगात केला आहे. त्यात वीस मानवी वर्षे म्हणजे उंदरांच्या आयुष्यातील सहा महिन्यात त्यांच्यामध्ये हृदयाच्या समस्या दिसून आल्या. दूरच्या अवकाश मोहिमांमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांची हानी होते असे त्यात दिसून आल्याचे डेल्प यांनी म्हटले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नवीन संसद भवन.. लवकरच

‘वायू भवन’ मागे उभारणी करण्याचे निश्चित? पंतप्रधानांच्या अनुमतीची प्रतीक्षा
भारतीय लोकशाहीचे प्रतीक असलेल्या संसदेला कदाचित नवे घर मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांचा प्रस्ताव स्वीकारून केंद्र सरकारने नवे संसद भवन उभारण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे. सध्याच्या वास्तूपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ‘वायू भवन’च्या मागील बाजूला त्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाला अनुमोदन दिल्यास १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाऊ शकते, कारण २०२२ हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने हा दुर्मीळ योगायोग साधण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

‘८९ वर्षांचे संसद भवन आता जीर्ण झाले असून भविष्याची गरज तिथे पूर्ण होण्याची शक्यता नाही. २०२१ मधील जनगणनेच्या आधारावर लोकसभा मतदारसंघांची संख्या २०२६ मध्ये वाढणार असल्याचे निश्चित आहे. तेव्हा लोकसभेचे सभागृह नव्या वाढीव संख्येसाठी अपुरे असेल,’ असे पत्रच श्रीमती महाजन यांनी डिसेंबरमध्ये केंद्रीय नगर विकास खात्याचे मंत्री व्यंकय्या नायडू यांना पाठविले होते. जीर्ण वास्तूबरोबरच पर्यटकांची वाढती वर्दळ, सुरक्षिततेच्या वाढीव गरजा, अत्याधुनिक तंत्रज्ञानांची आवश्यकता आदीही मुद्दे महाजन यांनी नव्या वास्तूच्या समर्थनार्थ मांडले होते.

महाजनांनी नव्या वास्तूसाठी दोन पर्याय सुचविले आहेत. एक तर सध्याच्या संसद भवनच्या विस्तीर्ण वास्तूमध्येच नवे सभागृह उभारावे किंवा ‘राजपथ’च्या पलीकडील ‘वायू भवन’च्या मागील म्हणजे ‘उद्योग भवन’समोरील जागेचा विचार करण्याची त्यांची सूचना होती. शहरी विकास मंत्रालयाने वायू भवनच्या मागील जागेला पसंती दिली आहे. ही जागा सध्याच्या वास्तूपासून एक किलोमीटर अंतरावर असून या दोन्ही वास्तू भुयारी मार्गाने जोडण्याचाही विचार केला जाऊ शकतो.

इतिहासाची चाळता पाने..

ब्रिटनच्या डय़ुक ऑफ कॅनॉटच्या हस्ते १२ फेब्रुवारी १९२१ रोजी संसदेच्या वास्तूचे भूमिपूजन करण्यात आले होते.

नवी दिल्ली या राजधानीच्या शहराची रचना ब्रिटिश वास्तुविशारद एडवर्ड ल्युटेन्स यांनी केली, पण संसदेची रचना सर हेबर्ट बेकर यांनी केली. मुख्य अभियंते होते सर ह्य़ूज कीलिंग आणि सर अलेक्झांडर राऊस.

सुमारे सहा वर्षांच्या बांधकामानंतर १८ जानेवारी १९२७ रोजी तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते उद्घाटन. बांधकामाचा एकूण खर्च ८३ लाख रुपये. तत्कालीन केंद्रीय विधानसभेची तिसरी बैठक नव्या वास्तूत झाली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानक, दिवसातून तीन वेळा सफाई!

नॉर्दन रेल्वेच्या फिरोजपूर क्षेत्रात जालंधर-अमृतसर मार्गावरील ब्यास रेल्वेस्थानकाला भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्वच्छतेच्या निकषावर देशातील रेल्वस्थानकांची क्रमवारी तयार करण्यासाठी आयआरसीटीसीने देशातील मुख्य रेल्वेस्थानकांची पाहाणी केली होती. कमी वर्दळीचे अतिशय शांत अशा छोटयाशा ब्यास रेल्वेस्थानकाला सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानकाच्या वर्गवारीत ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या नेतृत्वाखालील ‘स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत हे सर्वेक्षण करण्यात आले होते. गांधीधाम, वास्को-दी-गामा, जामनगर आणि कुंभकोणम या रेल्वेस्थानकांना या यादीत अनुक्रमे दुसरे, तिसरे, चौथे आणि पाचवे स्थान प्राप्त झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा